पुणे : गुजरात विजयावरून गदारोळ, भाजपाने मांडला ठराव : काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:36 AM2017-12-21T06:36:23+5:302017-12-21T06:36:32+5:30
गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणाºया ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रात्री उशिरा बराच गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपाने मांडलेल्या या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तीव्र विरोध केला; मात्र बहुमताच्या जोरावर भाजपाने ठराव मंजूर केला.
पुणे : गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणाºया ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रात्री उशिरा बराच गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपाने मांडलेल्या या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तीव्र विरोध केला; मात्र बहुमताच्या जोरावर भाजपाने ठराव मंजूर केला.
गुजरात निवडणुकीत भाजपाने सलग पाचव्यांदा विजय मिळवला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव सत्ताधारी भाजपाच्या वतीने सभेच्या शेवटी मांडण्यात आला. याच कारणावरून दुपारी ३ वाजता सुरू झालेली सभा रात्री तब्बल ८ वाजेपर्यंत सुरू ठेवली होती.
ठराव मांडल्यानंतर लगेचच त्याला विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी विरोध केला. या महापालिकेची अशी प्रथा नाही. पंतप्रधान व राष्ट्रपती अशा मोठ्या पदांवर निवडून आलेल्या व्यक्तीचे अभिनंदन आजपर्यंत करण्यात आले. ते देशाचे नेते असतात व त्यात गैर काहीच नाही. मात्र एका राज्यातील निवडणुकीत विजय मिळवला म्हणून असे अभिनंदन करणे चुकीचे आहे असे तुपे म्हणाले. काँग्रेसच्या अरविंद शिंदे, अजित दरेकर यांनी काँग्रेसनेही याच निवडणुकीत जागा वाढवून नैतिक विजय मिळवला आहे असे सांगितले व ठरावाला विरोध केला.
त्यांच्या विरोधानंतर सभागृहात बराच गदारोळ सुरू झाला. ठराव नको व ठराव हवाच, अशा दोन्ही बाजूंनी घोषणा वगैरे देण्यात येऊ लागल्या. राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक होते. त्यांना त्यापेक्षाही जास्त आक्रमकपणे भाजपाच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. अखेरीस भाजपाच्या वतीने थेट भाषणेच सुरू करण्यात आली. बहुतमाच्या जोरावर ठराव मंजूर करण्याचा निर्णय त्याच वेळी घेतला.
भाजपाच्या वतीने स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे, आरती कोंढरे, सुशील मेंगडे, सिद्धार्थ शिरोळे, माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावर भाषणे केली. चेतन तुपे यांनी ही चुकीची प्रथा पाडली जात आहे, अशी टीका केली व ठरावाला विरोध केला.