पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:18 PM2019-04-25T20:18:30+5:302019-04-25T20:27:03+5:30

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे..

Pune retains the remaining 7 TMC water for 81 days | पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

Next
ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरावे; जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्रकालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता

पुणे: महापालिका परिसर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात प्रकल्पात ७.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून जलसंपदा विभागाने येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे. परिणामी पुढील ८१ दिवसांसाठी आता केवळ सात टीएमसी पाणी उरले आहेत. पालिका प्रशासनाने अजूनही पाणीवापराबाबत काटकसर सुरू केलेली नाही.त्यातच पालिकेने उन्हाळ्यात पाणी जपून वापरावे, असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी पुरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे.तरीही जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालिका परिसरात कोणतीही पाणी कपात न करता पाणी दिले जात आहे.तसेच शेतीसाठी सुध्दा गेल्या १४ दिवसापासून पाणी सोडण्यात आले असून एकूण २.६८ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. आत्तापर्यंत सुमारे १.४५ टीएमसी पाणी कालव्यातून ग्रामीण भागापर्यंत दिले गेले असून अजूनही १.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे.त्यामुळेच पालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी वापरावे,असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.
सध्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पालिकेला १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. मात्र, पालिकेकडून १४०० ते १४५५ एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे.परंतु,पालिकेने अधिकचे पाणी वापरले तर येत्या १५ जुलैपर्यंत नागरिकांना पाणी पुरवणे कठिण जाणार आहे.त्यामुळे पालिकेने आत्तापासूनच काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे.
--------------------
खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ७ टीएमसी एवढा साठा असून पुढील ८१ दिवस पुण्याताला सुमारे ४ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.तसेच ग्रामीण भागासाठी सोडण्यात आलेले पाणी इंदापूरपर्यंत पोहचले असून आता दौंड भागात शेतीसाठी पाणी दिले जात आहे.त्यामुळे अजून दीड टीएमसी पाणी द्यावे लागणार असल्याने धरणातील ५.५ टीएमसी पाणीसंपणार आहे.तसेच अर्धा टीएमसी पाणी बाष्पिभवनात जाणार असल्याने येत्या १५ जुलैपर्यंत धरणातील ६.५ टीएमसी पाणी संपेल.मात्र,१३५० एमएलडी पाणी वापर झाला तरच हे शक्य आहे.परंतु,सध्या पालिकेकडून १४५० पेक्षा जास्त पाणी वापर केला जात असल्याने पाऊस लांबल्यास पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.

Web Title: Pune retains the remaining 7 TMC water for 81 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.