पुणे : पासिंगशिवायच रिक्षा रस्त्यावर;आरटीओसमोर घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:40 AM2018-01-22T06:40:02+5:302018-01-22T06:40:17+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या हजारो रिक्षांचे पासिंग रखडले आहे. पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षांचालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत.
पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या हजारो रिक्षांचे पासिंग रखडले आहे. पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षांचालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत.
या त्रासाला कंटाळून आता यापुढे पासिंग नसलेली रिक्षा मार्गावर नेणार असल्याची भूमिका रिक्षाचालकांनी घेतली असून दंडाची रक्कम मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांकडून वसूल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. विविध मागण्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने शनिवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर (आरटीओ) आंदोलन करण्यात आले.
त्या वेळी रिक्षाचालकांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी संघटनेकडून एक पत्र तयार करण्यात आले
असून त्यावर इनवर्ड नंबर घेऊन रिक्षाचालक व्यवसाय करणार आहेत.
त्यात नमूद करण्यात करण्यात आले आहे, की माझी संपूर्ण उपजीविका रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आरटीओ पासिंगचे काम करून दिले नाही तरी मी वाहन वापरणार आहे.
शनिवारी झालेल्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, संंस्थापक आबा बाबर,
उपाध्यक्ष गंगाधर महाडिक, कार्याध्यक्ष नितीन साळुंखे, सरचिटणीस विजय लांडे, संघटक रवींद्र अडसुळ यांच्यासह सुमारे २५० रिक्षाचालक सहभागी झाले होते.
पासिंगसाठीची आॅनलाइन अपॉइंटमेंट सुविधा २४ तास सुरू ठेवावी, दररोज अपॉइंटमेंट करण्याची क्षमता वाढवावी, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
पासिंग न केलेले वाहन चालविले म्हणून कारवाई व अपघाती नुकसान झाल्यास त्याबाबतची नुकसानभरपाई, दंड माझ्याऐवजी पुणे आरटीओ, मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, परिवहन सचिव व परिवहन आयुक्त यांच्याकडून वसूल करण्यात यावा, असे रिक्षाचालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़