कोट्यवधीचा खर्च; तरीही खड्डेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:32 AM2017-07-28T06:32:02+5:302017-07-28T06:32:05+5:30

‘पावसाळीपूर्व काम’ म्हणून महापालिकेने शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला; मात्र गेल्या १५ दिवसांच्या पावसाने बहुतेक रस्त्यांवरील खड्डे पुन्हा जिवंत झाले आहेत.

pune road pothole | कोट्यवधीचा खर्च; तरीही खड्डेच

कोट्यवधीचा खर्च; तरीही खड्डेच

Next

पुणे : ‘पावसाळीपूर्व काम’ म्हणून महापालिकेने शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला; मात्र गेल्या १५ दिवसांच्या पावसाने बहुतेक रस्त्यांवरील खड्डे पुन्हा जिवंत झाले आहेत. या कामाची कसलीही चौकशी केली जात नसून महापालिका प्रशासन, काम करणारे ठेकेदार व महापालिकेचे विश्वस्त असलेले नगरसेवक, पदाधिकारी असे सगळेच यावर मूग गिळून गप्प आहेत.
खड्डे बुजविण्यासाठी महापालिका ठेकेदारी पद्धतीवर काम देते. दर वर्षी ठराविक ठेकेदार साखळी करून हे काम घेतात. त्यांना ठिकाणाची महापालिकेने माहिती द्यायची व त्यांनी तिथे जाऊन कामगारांकरवी खड्डे बुजवायचे, अशी पद्धत आहे. दुसºया प्रकारात महापालिकेने रोड मेंटेनन्स व्हेईकल तयार केली आहेत. अशी १२ वाहने महापालिकेकडे आहेत. त्यात खड्डे बुजविण्याचे साहित्य, कर्मचारी असतात. महापालिका स्तरावर व प्रभाग स्तरावर अशा दोन्ही पद्धतींनी खड्डे बुजविण्याचे काम केले जाते.
दर पावसाळ्यापूर्वी महापालिका खड्डे बुजविण्याचे काम करते. ठेकेदार व महापालिका अशा दोन्ही स्तरांवर हे काम होते. या वर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेने फक्त खड्डे बुजविण्यासाठी म्हणून २५ लाख रुपये खर्च केले आहेत. शहरातील बहुतेक सर्व रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचे काम झाल्याची महापालिकेकडे नोंद आहे. तरीही, १५ दिवसांच्या पावसात सर्व खड्डे वर आले आहेत. त्यातील डांबर वाहून गेले. खडी वर आली आहेत. काही ठिकाणी सिमेंट व खडीचे मिश्रण टाकून खड्डे बुजवले जातात; मात्र तिथेही ते व्यवस्थित बुजवले न गेल्याने त्यातील सिमेंट वाहून उखडले गेले आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

खड्डे बुजविण्याचे काम वर्षभरासाठी दिले जाते. चार ते पाच ठेकेदार मिळून ते घेतात. याशिवाय महापालिकेची १२ वाहनेही कार्यरत असतात. तरीही रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविले जात नाहीत. त्याविषयी फारच ओरड होऊ लागली, की त्याकडे लक्ष दिले जाते. पावसाळ्यात पाऊस थोडा उघडला, की खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरू होणे अपेक्षित असते; मात्र ठेकेदार त्यांचे कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत वाट पाहतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी जायचे असेल, तर कर्मचारी संख्या न वाढवता आहे त्याच मोजक्या कर्मचाºयांमध्ये काम करून घेतात.

खड्डे बुजविण्यासाठी कॅटलिक इमल्शन नावाचे अत्याधुनिक मिश्रण वापरले जाते. ते महागडे आहे; मात्र पाऊस सुरू असला तरी हे मिश्रण टाकून खड्डे बुजवता येतात. या मिश्रणाचा वापर करतानाही तो शास्त्रीय पद्धतीनेच करावा लागतो. त्या पद्धतीने खड्डा बुजवला गेला तर तो किमान वर्षभर तरी टिकतो. मात्र, ही पद्धत ठेकेदार किंवा महापालिकेच्या कर्मचाºयांकडून वापरली जात नाही. त्यामुळेच इतके महागडे मिश्रण वापरूनही खड्डे व्यवस्थित भरले जात नाहीत व लगेचच पुन्हा पडतात.

रस्त्यांना खड्डे पडतात, याचे कारण त्यावर सातत्याने अनेक यंत्रणांची वेगवेगळ्या कारणांनी खोदाईची कामे सुरू असतात. त्यात महापालिकेचाही समावेश आहे. बिघडलेली जलवाहिनी दुरुस्त करणे, ड्रेनेजलाईन टाकणे या कामांचा त्यात समावेश आहे. याशिवाय मंडपासाठी खड्डे, कमानींसाठी खड्डे खोदले जातात. तेही बुजवले जात नाहीत. त्यात पाणी साठते व ते फाटतात. खोदलेले भाग व्यवस्थित बुजवले गेले तरी ते मूळ रस्त्यासारखे होत नाहीत. त्यातून रस्त्याचे आरोग्य बिघडते. तरीही अन्य शहरांमधील रस्त्यांपेक्षा पुण्यात रस्ते बरे आहेत. सर्व ठेकेदारांना खड्डे तसेच रोड मेंटेनन्स व्हेईकललाही खड्ड्याची माहिती मिळताच तो त्वरित बुजवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या कामांवर लक्ष ठेवण्यास कनिष्ठ अभियंत्यांनाही सांगण्यात आले आहे.
- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका

खड्ड्यांवर आता ‘पेव्हिंग ब्लॉक’चा उतारा
शास्त्रीय पद्धतीनुसार बुजविताना खड्डा आहे त्यापेक्षा मोठा करणे गरजेचे असते. आतील बाजूने पुन्हा मोठा करून घ्यावा, सर्व माती बाहेर काढून तो स्वच्छ करावा व त्यानंतर त्यात खडी व डांबर यांचे मिश्रण टाकावे. असे केल्यानंतरच तो खड्डा खºया अर्थाने बुजला जातो. त्यानंतर तो रस्ता खराब होतो; पण बुजवलेल्या खड्डा उखडत नाही. या पद्धतीनेच खड्डे बुजविणे अपेक्षित आहे; मात्र तसे ना महापालिकेचे कर्मचारी करतात ना ठेकेदाराचे! खड्डा दिसला, की लगेचच त्यात डांबर व खडीचे मिश्रण टाकले जात आहे. त्यामुळेच बहुतेक खड्डे थोड्याशा पावसानेही फाटले आहेत. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना त्यावर भागातील महापालिकेच्या जबाबदार अभियंत्याने लक्ष देणेही आवश्यक आहे; मात्र असे पर्यवेक्षण केले जात नाही. ठेकेदाराच्या अभियंत्यांनाही त्यांचे काम सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन कामाची तपासणी करणे गरजेचे आहे; पण तेही होत नाही. कामाची तपासणीच होत नसल्याने व नंतरही ती केली जाणार नाही, याची खात्री असल्यानेच ठेकेदार व त्यांचे कर्मचारी निकृष्ट मालाचा वापर करून खड्डे बुजवतात. असे खड्डे पावसाळ्यात तग धरू शकत नाहीत व लगेचच उखडतात. अनेकदा तर तक्रार आल्यावर केवळ जुजबी मलमपट्टी केली जाते. त्यामुळे आठ- दहा दिवसांतच पुन्हे मोठे खड्डे पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Web Title: pune road pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.