‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’; किडनी प्रत्याराेपणाबाबत ससूनची पावले ‘जपून’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 09:32 AM2022-08-18T09:32:08+5:302022-08-18T09:32:21+5:30
सध्या समितीसमोर किडनी प्रत्याराेपण मंजुरीसाठी पाच प्रकरणे
पुणे : रुबी हाॅल किडनी प्रत्याराेपण तस्करी प्रकरणाचे हादरे आराेग्य विभागासह रुबी हाॅल क्लिनिक व ‘ससून’चे तत्कालीन अधीक्षक डाॅ. अजय तावरे यांना बसले. त्यामुळे ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे ससूनच्या नवीन विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे काम सुरू आहे. सध्या समितीसमोर किडनी प्रत्याराेपण मंजुरीसाठी पाच प्रकरणे आली आहेत. त्यांपैकी दोन अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. दोन प्रकरणांसाठी गुरुवारी (दि. १८) बैठक होणार आहे, तर एका प्रकरणाच्या कागदपत्रांबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन समितीकडून घेण्यात येणाऱ्या बैठकीत अतिशय सतर्कता, सावधगिरी बाळगण्यात येत आहे. काेणताही कच्चा दुवा सुटू नये यासाठी खास काळजी घेण्यात येत आहे. पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. समितीकडे आलेल्या अर्जांचे संबंधित कागदपत्रांची बारकाईने छाननी करून त्यानंतरच मान्यता द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जात आहे. तो अर्ज पुनरावलोकनासाठी (रिव्ह्यू) पाठवण्यात आला आहे. दोन अर्जांसोबत असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून मान्यता देण्यात आली.
दाेन प्रकरणे भारताबाहेरील
पाचपैकी दाेन प्रकरणे भारताबाहेरील रहिवाशांची आहेत. त्यांची प्रत्याराेपण शस्त्रक्रिया पुण्यात होणार आहे. मात्र, त्यांचे नाते जवळून असल्याचे कागदी पुरावे समितीकडे आहेत. उर्वरित दोन अर्जांबाबत आज, गुरुवारच्या बैठकीत चर्चा केली जाईल. या बैठकीत चर्चेला घेण्यात येणार असलेला एक अर्ज केवळ ना हरकत प्रमाणपत्रासाठी आहे. एक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कर्नाटकात, तर दुसरी पुण्यातील ससून रुग्णालयात होणार आहे.
नातेसंबंधाची बारकाईने तपासणी
प्रत्यारोपण समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी करताना दाता आणि रुग्ण यांच्यातील नातेसंबंध बारकाईने तपासले जात आहेत, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे व अधीक्षक डॉ. भारती यांनी दिली.