पुणे : विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित, मार्ग काढण्याचे शरद पवार यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:37 AM2018-02-26T05:37:45+5:302018-02-26T05:37:45+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. येत्या २८ फेब्रुवारीला होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. येत्या २८ फेब्रुवारीला होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
सिंहगड शिक्षण संस्थेतील अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी मागील दहा दिवसांपासून विद्यापीठात उपोषणाला बसले आहे. अध्यापनाचे काम बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार आहे. शनिवारी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली; तसेच प्राध्यापकांच्याही मागण्या त्यांची भेट घेऊन समजून घेतल्या. त्यानंतर कुलकर्णी यांनी कुलगुरू नितीन करमळकर यांची प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधींसह भेट घेतली. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी करमळकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक दि. २८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या बैठकीत सिंहगडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत; तसेच अध्यापनाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण २८ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मार्ग काढण्याचे शरद पवार यांचे आश्वासन-
पुणे : वर्ग सुरू व्हावेत, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपोषणाला बसलेल्या सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. पवार यांनी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.
दि. ६ मार्चपासून परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडली. शरद पवार यांनी केंद्र, राज्य सरकार, संस्थेचे शिक्षक आणि संस्थाचालक यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. या वेळी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अभिषेक बोके, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आदेश गाडे, भाग्येश क्षीरसागर, अमोल नेवसे, अभिजित कोलते, तेजस जाधव, नसीन शेख, भूषण डबाळे, रवीकांत वर्पे, मारुती अवगंड आदी उपस्थित होते.