Uddhav Thackeray: पुण्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे विधानसभेच्या ४ जागांचा दावा करणार
By राजू इनामदार | Published: August 2, 2024 04:56 PM2024-08-02T16:56:02+5:302024-08-02T16:57:16+5:30
शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेट या मतदारसंघांबरोबरच कसबा विधानसभा मतदारसंघाचाही दावा शिवसैनिक करणार
पुणे: एकेकाळी ४ विधानसभा मतदारसंघ ताब्यात असणाऱ्या पुण्यात शिवसेनेला मागील अनेक वर्षे राजकीय विजनवासात काढावी लागली आहेत. फूट पडल्यानंतर राजकीय शक्ती आणखीनच कमी झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहर शिवसेनेचा हा राजकीय विजनवास संपवणार का? शनिवारच्या मेळाव्यात शहरातील शिवसैनिकांना संजीवनी देणार का? याविषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे.
राजकीय इतिहास
दिवंगत काका वडके, नंदू घाटे यांनी शिवसेनेला पुण्यात चळवळीची तर शशिकांत सुतार यांनी राजकीय ओळख मिळवून दिली. सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर हा कोथरूडचा गौरव सुतार यांच्यामुळेच झाला. महापालिकेतील कारकिर्द गाजवल्यानंतर ते शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून २ वेळा निवडून गेले. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत कोथरूडचा पहिला आमदार म्हणून शिवसेनेच्याच चंद्रकांत मोकाटे यांनी संधी मिळाली. दरम्यानच्या काळात दिवंगत विनायक निम्हण यांनी शिवसेनेकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांवर दोन वेळा झेंडा रोवला. कॅन्टोन्मेटमध्येही दिवंगत सूर्यकांत लोणकर आमदार झाले. महापालिकेतही शिवसेनेचे ८ ते १० नगरसेवक निवडून येत.
यशाला ओहोटी
या राजकीय यशाला ओहोटी लागली त्यालाही आता अनेक वर्षे झाली. शिवसेनेचा पुणे शहरात गेली अनेक वर्षे एकही आमदार नाही. नगरसेवकही एक अंकी संख्येतच निवडून येत आहेत. खासदारकीचे नावच नाही. सुरूवातीला भाजप बरोबर व आता महाविकास आघाडीबरोबर शिवसैनिकांची फरपट सुरू असल्याची खंत अनेक जुन्या शिवसैनिकांना आहे. त्यातच राज ठाकरे यांनी बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुन्हा अलीकडेच फूट पडल्यामुळे शिवसेनेची शहरातील राजकीय शक्ती आणखीनच कमी झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख झालेल्या उद्धव ठाकरे यांनी किंवा शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांनीही मुंबईनंतर ठाणे, कल्याण इकडेच लक्ष केंद्रीत केले. पुण्यातून राजकीय बळ मिळत नसल्याने नेत्यांचेही पुण्यातील लक्ष कमी झाले.
विधानसभेची तयारी
आता विधानसभा निवडणुकीसाठी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. राज्यातील अन्य शहरांबरोबरच पुण्यातूनही त्यांनी अनेक अपेक्षा ठेवल्या असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शहर शिवसेनेच्या मेळाव्याला येण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणे त्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.३) गणेश कलाक्रिडा मंदिरात शहर शिवसेनेचा मेळावा होत आहे. जिल्ह्यातील गटप्रमुखांनाही मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. उद्धव यांच्याबरोबर माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क नेते आमदार सचिन अहिर व अन्य पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्याकडे मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
चार मतदारसंघाची मागणी
महाविकास आघाडीतूनच शिवसेना विधानसभा लढणार हे नक्की आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ( शऱ्द पवार) यांची शहरात विशेष राजकीय ताकद नाही. शिवसेनेकडे तरूणाईचे जाळे आहे. त्यामुळेच शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेट या मतदारसंघांबरोबरच कसबा विधानसभा मतदारसंघाचाही दावा शहरातील शिवसैनिक करणार असल्याची चर्चा आहे.