Pune: पैसे देण्यास नकार देताच झाडल्या गोळ्या, पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:02 PM2024-04-20T12:02:28+5:302024-04-20T12:03:09+5:30
या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : हॉटेलमध्ये पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री येरवडा भागात घडली. या गोळीबारात विकी राजू चंडालिया (रा. जय जवान नगर, येरवडा) हा तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आकाश चंडालिया, अक्षय चंडालिया, अमन चंडालिया, अभिषेक चंडालिया (सर्व जण रा. रेंजहिल्स, पुणे), सुशांत कांबळे (रा. पर्णकुटी सोसायटी, येरवडा), संदेश जाधव आणि संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत. गोळीबार वैयक्तिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी आकाशवर यापूर्वी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस हद्दीत गुन्हे दाखल आहेत. तो सहा महिन्यांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून बाहेर आला आहे. येरवड्यातील अग्रसेन शाळेसमोर पर्णकुटी सोसायटीजवळ गीता भोसले यांचे व्हीआरफोरयू नावाचे हॉटेल आहे. हॉटेलचे सर्व काम विकी पाहतो. आरोपी आकाश विकीचा लहानपणीचा मित्र आहे. आठ दिवसांपूर्वी आकाशने हॉटेलमध्ये येऊन विकीकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी विकीने पैसे देण्यास नकार दिला. आकाशने त्याला दम दिला. स्थानिक नागरिकांनीदेखील यापूर्वी हॉटेलसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. परिसरात लूटमार, दहशत निर्माण करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
गुरुवारी मध्यरात्री १च्या सुमारास विकी याचा मित्र वैभव, मामी गीता भोसले आणि त्यांची लहान मुलगी हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी आकाश, अक्षय, अमन, अभिषेक, संदेश, सुशांत, संकेत हॉटेलमध्ये आले. आकाशने विकीकडे पैशांची मागणी केली. विकीने नकार दिला. त्याचवेळी आरोपींनी विकीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आकाशने पिस्तूल काढून ‘तुझा आज गेमच करतो,’ असे म्हणून विकीवर गोळी झाडली. ती त्याच्या पोटात लागली. याच वेळी इतर आरोपींनी विकीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. जिवाच्या भीतीने विकीने पळ काढला. विकीचा भाऊ राहुल याला हॉटेलमधून गोळीबाराची माहिती देण्यात आली. त्याने पोलिसांना कळवले. घटनेची माहिती समजताच येरवडा पोलिसांसह अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.