Vande Bharat Express: पुणे-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; गती वाढणार पण प्रवासही महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:41 PM2022-02-17T13:41:01+5:302022-02-17T13:42:28+5:30
वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ एक ते दीड तासाने कमी होईल, मात्र तिकिटाचा खर्च जवळपास ४० टक्क्यांनी महागणार आहे
प्रसाद कानडे
पुणे : पुणे - सिकंदराबाद रेल्वे मार्गावर शताब्दी एक्स्प्रेसऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मात्र यासाठी आणखी काही महिने लागतील. वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ एक ते दीड तासाने कमी होईल, मात्र तिकिटाचा खर्च जवळपास ४० टक्क्यांनी महागणार आहे. राजधानी एक्स्प्रेसला तेजसचे डबे जोडल्यानंतर राजधानीच्या तिकीट दरात वाढ झाली. तोच बदल 'शताब्दी'च्या बाबतीत लागू केला जाईल. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा वेळ वाचेल, प्रवास आरामदायक होईल, मात्र तेवढाच तो खर्चिक देखील होणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसची सेवा बंद झाली. ती गाडी आजतागायत सुरू झाली नाही. आता या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डाने यासंदर्भात गुप्तता पाळली आहे. मात्र रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार हे निश्चित आहे.
२४ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार
देशात जवळपास २४ रेल्वे मार्गांवर शताब्दी एक्स्प्रेस धावते. यात अनेक गाड्यांना जुना रेक वापरला जात आहे. ज्याप्रमाणात वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे उपलब्ध होत आहेत, त्याप्रमाणात वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. यात पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.
एका दिवसात १० डबे तयार
चेन्नई येथील आयसीएफ कोच फॅक्टरीत एका दिवसात १० डबे तयार करण्याची क्षमता आहे. केवळ आयसीएफला वर्षात ३६७८ डब्यांचे उत्पादन करण्याचे आदेश देण्यात आले. २०१८ - १९ मध्ये आयसीएफने वर्षभरात जवळपास ४ हजार डबे तयार करण्याचा विक्रम केला होता, ज्या तुलनेत डबे उपलब्ध होतील, त्या प्रमाणात वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
गती १३०, तर प्रवासाचा वेळ १ तासाने वाचणार
पुणे - सिकंदराबाद रेल्वे मार्गावर सध्या रेल्वे ताशी ११० कि.मी. वेगाने धावत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता ताशी १८० कि.मी. वेगाने धावण्याची जरी असली तरीही, त्या योग्यतेचा ट्रॅक नाही. त्यामुळे ट्रॅकचे अपग्रेडेशन केल्यावर पुणे - सिकंदराबादचा ट्रॅक १३० कि.मी. वेगासाठी फिट केला जाईल. त्यानंतरच वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १३० कि.मी. गतीने धावेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होईल.