संगीत क्षेत्रातही नरेंद्र मोदींचे नाव; आळविला ‘नरेंद्र’ राग, पुण्यातील गायिकेची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:13 PM2021-10-28T16:13:34+5:302021-10-28T18:03:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, वैचारिक चिंतन आणि कार्यकर्तृत्व याचे वर्णन करणाऱ्या ‘नरेंद्र’ नामक अनोख्या रागाची निर्मिती गायिका डॉ. रेवा नातू यांनी केली आहे
नम्रता फडणीस
पुणे: राजकारणातच नव्हे, तर आता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही ‘नरेंद्र’ राग आळविला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, वैचारिक चिंतन आणि कार्यकर्तृत्व याचे वर्णन करणाऱ्या ‘नरेंद्र’ नामक अनोख्या रागाची निर्मिती गायिका डॉ. रेवा नातू यांनी केली आहे. यापूर्वी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यावर ‘गांधी मल्हार’, ‘प्रियदर्शिनी’ आणि 'इंदिरा कल्याण’ सारखे राग साकारण्यात आले आहेत. या रागांमध्ये आता ‘नरेंद्र’ रागाची भर पडली आहे.
भारतीय रागसंगीत हे परिवर्तनशील आहे. सृजनशील कलाकार चिंतन आणि साधनेतून संगीतात नवनवीन प्रयोग करीत असतो. रंजकता आणि सर्जनशीलता हेच शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात सकारात्मक विचारांची पेरणी झाली. ‘मन की बात’च्या माध्यमातून संवाद साधत प्रत्येकाची दखल घेत त्यांनी समाजाला प्रोत्साहित करण्याचे काम केले. ‘योग दिन’ सारख्या अनेक नवीन उपक्रमांची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. पंतप्रधानांप्रति आदर आणि सन्मान व्यक्त करण्याच्या भावनेतून या ‘नरेंद्र’ रागाची निर्मिती केली असल्याची माहिती डॉ. रेवा नातू यांनी ‘लोकमत’ला दिली.
रेवा नातू यांनी तयार केलेला राग
बडा ख्याल मध्यलय रूपक
स्थायी
''देश के ध्यान में सदा रत
मन की बात जो करे नित
ध्यास विकास ध्यास प्रकाश
जनसंवाद से मन मन जीते नित!''
अंतरा
''राग नरेंद्र गुंजे गगन मा
जगत भर को योग दिया
राम का धाम ही अवध बना!''
''माझ्याकडून ‘नरेंद्र’ रागाची निर्मिती होणे हा मी देवी सरस्वतीचा आशीर्वाद मानते. हा राग पंतप्रधानांसमोर सादर करण्याची इच्छा डॉ. रेवा नातू यांनी व्यक्त केली आहे.''