स्मार्ट सिटीच्या कामांना गती द्या! झाडांची उंची लक्षात घेऊन डबल डेकर बस सुरू करा-चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:04 AM2023-01-10T10:04:42+5:302023-01-10T10:04:49+5:30
पायाभूत सुविधा, विकासकामे दर्जेदार होतील यावर विशेष लक्ष द्यावे
पुणे : स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचा आढावा घेत सर्व कामे कालमर्यादेत आणि गतीने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. शहरात दुमजली (डबल डेकर) बस सुरू करण्यासाठीची तयारीदेखील तातडीने करा, असे निर्देश त्यांनी दिले.
आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पालिकेच्या सहआयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, शहरातील झाडांची उंची लक्षात घेऊन डबल डेकर बस सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करावी. पायाभूत सुविधा, विकासकामे दर्जेदार होतील यावर विशेष लक्ष द्यावे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) होणारे परीक्षण (ऑडिट) योग्यरीतीने होत असल्याची खात्री करून राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. सकाळच्या वेळेत उद्यानांमध्ये मंद आवाजात संगीत लावावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कामांचा आढावा
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून राबविण्यात येत असलेले थीम बेस्ड उपक्रम, ज्येष्ठ नागरिक पार्क, सायन्स पार्क, रिॲलिटी पार्क, शहरातील झाडांची देखभाल, वायफाय सुविधा, इमर्जन्सी कॉलबॉक्स, स्मार्ट ई-बस, स्ट्रीट लाइट, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा (अडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) कामे आदी कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.