कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीस बंद! वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:55+5:302021-06-03T04:08:55+5:30
कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पुणे-सोलापूर महामार्गावर आल्याने निर्माण झालेल्या समस्येने गंभीर स्वरूप ...
कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पुणे-सोलापूर महामार्गावर आल्याने निर्माण झालेल्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील पाच किलोमीटर वाहतूक बंद करून सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे.
याबाबत होणाऱ्या समस्येमुळे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मंगळवार (दि.१) रोजी कुरकुंभ येथे बाधित क्षेत्राला भेट देऊन महामार्गावरील साचलेल्या पाण्याचा आढावा घेतला व दूषित पाणी त्वरित उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या तरी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे.
प्रदूषित पाण्यावर तहसीलदार संजय पाटील यांनी आढावा बैठक घेऊन दिलेल्या आदेशावर सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने तात्पुरती स्वरुपाची कारवाई करीत दूषित पाणी उचलण्याचे सोंग केले. मात्र, एका पावसाने या सर्व प्रकारावर पाणी फेरले आहे. दरम्यान, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दोन दिवसांत पाणी उचलून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले जरी असले, तरी मात्र याचा तत्सम तंत्रणेवर कितपत परिणाम होतो आहे हे पाहणे आवश्यक आहे. या प्रदूषित पाण्याने बाधित शेतकऱ्यांनी पाणी अडवण्याची तटस्थ भूमिका घेतल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. कुरकुंभ येथील प्रकल्पातून निघणारे दूषित पाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करण्यासाठी सोडले जाते. मात्र, याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दूषित पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा आरोप होत आहे.याच प्रक्रिया केंद्रातील पाणी जवळच्या रोटी वनविभागात सोडण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावर वरिष्ठांकडे निर्णय घेतला जात नसल्याचे कारण पुढे केले जात असून तूर्तास पाण्यावर प्रक्रिया न करताच सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
प्रदूषण मंडळाची हतबलता_
सामाईक सांडपाणी केंद्रात पाणी न सोडता उघड्यावर पाणी सोडणाऱ्या प्रकल्पधारकांवर व सामाईक सांडपाणी केंद्रावर कारवाई करण्याचे धाडस प्रदूषण मंडळाकडून दाखवले जात नसल्याने समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पाणी कुठून येते, ह्या प्रश्नावर काहीच उत्तर नसल्याने अधिकाऱ्यांची हतबलता दिसून येते.
शॉर्टकट ठरतोय जीवघेणा_____
कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील महामार्ग बंद केला असल्याने परिसरातील कामगार व ग्रामस्थ महामार्गावरील बंद केलेल्या रस्तादुभाजकाचा वापर करू लागले आहेत, यामध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी चौकात महामार्ग प्रशासनाने सुरक्षारक्षक ठेवले असून, त्यांनादेखील कोणी जुमानत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सध्यातरी शॉर्टकट जीवघेणा ठरतोय असंच दिसून येते आहे.