मोठी बातमी : पुणे -सोलापूर हायवे वाहतुकीसाठी बंद; पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 11:42 PM2020-10-14T23:42:53+5:302020-10-15T00:15:47+5:30

उजनी, खडकवासला, चासकमान, पानशेत या धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे.

Pune-Solapur highway closed for traffic; Flood-like conditions in Pune due to torrential rains | मोठी बातमी : पुणे -सोलापूर हायवे वाहतुकीसाठी बंद; पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती  

मोठी बातमी : पुणे -सोलापूर हायवे वाहतुकीसाठी बंद; पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती  

Next

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यावरून पाणी वाहत असून काही ठिकाणी घरात देखील पाणी शिरले आहे. उजनी,खडकवासला, चास कमान, पानशेत या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. उजनी धरणातील पाणी पुणे- सोलापूर महामार्गावर वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. तसेच इंदापूर, बारामती, भिगवण, नीरा नरसिंगपूर भागातील भीमा, कऱ्हा, मुळा, मुठा या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. 

कात्रजमध्ये १४२ मिमी, खडकवासला १०८ मिमी पाऊस 
पुणे शहरात रात्री उशिरा धुवांधार पाऊस सुरु असून सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कात्रज येथे रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आणखी जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे अंबील ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे. कात्रज येथे रात्री १० ते ११ वाजेपर्यंत दरम्यान एका तासात ७५ मिमी पाऊस पडला असून एका तासात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला आहे.  गेल्या वर्षी २५ सप्टेबरला असाच धुंवाधार पाऊस झाला होता. 

आशय मेजरमेंटनुसार, दुपारी अडीच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. रात्री साडेआठ वाजल्यानंतर पावसाला मोठ्या प्रमाणावर सुरु झाली असून रात्री १० ते ११ वाजेपर्यंत एका तासात विक्रमी पाऊस कात्रज भागात पडला आहे. 
याबाबत शंतनु पेंढारकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी कात्रज भागातही ८१ मिमी पाऊस पडला होता. मात्र, त्याचवेळी गुजरवाडी, भिलारेवाडी, बोपदेव घाट या परिसरात ढगफुटी होऊन जवळपास २०० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे त्या पावसाचे सर्व पाणी अंबील ओढ्याला येऊन या भागात मोठा विध्वंस झाला होता. 

.........................

शिवाजीनगर येथे विक्रमी ९६ मिमी पाऊस
पुणे हवामान विभागाच्या शिवाजीनगर येथील केंद्रात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत विक्रमी ९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद आहे़.


सकाळी साडेआठ वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत फक्त ४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेपर्यंत १९. ८ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर साडेआठ ते रात्री साडेअकरा या तीन तासात तब्बल ७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. गेल्या काही वर्षात शिवाजीनगर येथे तीन तासात पडलेल्या हा विक्रमी पाऊस आहे. 

बारामती, इंदापूर रस्त्यावर अवतरली नदी; शेकडो वाहने पुरात अडकली .. 
बारामती :  बारामती शहर आणि तालुक्यात तुफान पाऊस कोसळतो आहे. ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस धो धो बरसत आहे. इतिहासात पहिल्यांदा बारामती- इंदापूर रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात पूर आला होता . टोल नाका , पिंपली , लिम्टेक भागात अक्षरशः रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.विशेषतः ओढ्यावरील पुलावर हे प्रमाण अधिक होते. चारचाकी वाहने बुडून जातील , एवढे पाणी रस्त्यावर साठले होते.रस्त्याला आलेला पूर आणि पावसाचा रुद्रावतार पाहून अनेकांनी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवली. लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .काहींनी जीव मुठीत धरून वाहने पाण्यात घातली .यातील अनेक दुचाकी, चारचाकी वाहने पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकले होते. 

इंदापूर तालुक्यात दोन व्यक्ती वाहुन गेल्या... 

निमसाखर : इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील निरा नदीला मिळणाऱ्या नंदकिशोर मंदिराजवळील ओढ्यात पावसामुळे आलेल्या पाण्याच्या प्रवाहात दोन व्यक्ती वाहुन गेले. त्यापैकी एका व्यक्तीला स्थानिकांनी वाचवले असुन दुसर्‍या व्यक्तीला सायंकाळी ०७:०० वाजले पासुन ११:०० वाजले तरी बाहेर काढण्यात आले नसुन प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी कुचकामी ठरली आहे

याविषयी इंदापूरच्या तहसीलदारांशी संपर्क केला. आम्ही येतोय असे त्यांनी सांगितले. रात्री उशिरा या अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने बोट आणली होती. 

 

ठिकाण        रात्री साडेआठ    रात्री १०     रात्री ११    
कात्रज            २७ मिमी        ६७              १४२    
खडकवासला    २१               ३६               १०८    
वारजे              १९                ३३              ६३
कोथरुड           १४                ३२              ६७

.........................................................

उपनगरांमधली पावसाची परिस्थिती ... 
बिबवेवाडीत ढग फुटीसारखा पाऊस पडत आहे. तसेच वाघोलीत सुद्धा मागील पाच तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे. 
 सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलाच्या पुढे एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. रांका ज्वेलर्सच्या समोरील रस्ता बंद केला आहे. रस्त्यावर प्रचंड पाणी साठले आहे. दुचाकीवरून येणारे जाणारे लोक पाण्याच्या प्रवाहामुळे आणि रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे चालवताना पडत आहे. दांडेकर पूल जवळील घरामध्ये पाणी शिरले. वडगाव धायरीच्या पुलाखाली गुडघाभर पाणी साठले होते. 

आंबील ओढ्याचे पाणी वाढण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचीमाहिती आहे . पाषाण येथील शिवशक्ती चौक परिसरात रस्त्यावर पाणी साठले असून ओढ्याचे स्वरूप आले आहे. वारजे मुख्य चौकात उड्डाणपुलाखाली कमरे इतके पाणी वाहत होते. सर्व रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप पद्मावती मधील रस्त्यांवर पाणीच पाणी आले आहे. 

Web Title: Pune-Solapur highway closed for traffic; Flood-like conditions in Pune due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.