DEMU Railway | हडपसरहून सुटणार पुणे-साेलापूर, पुणे-दाैंड डेमू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:28 AM2023-03-02T08:28:36+5:302023-03-02T08:30:07+5:30
हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या आता चार झाली आहे...
पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनलवरून येत्या सोमवारपासून पुणे - सोलापूर आणि पुणे - दौंड डेमू या दोन रेल्वे सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या दोन रेल्वे आता हडपसरवरून सुटणार आहेत. त्यामुळे हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या आता चार झाली आहे.
पुणे रेल्वे स्टेशनच्या यार्ड रिमोल्डिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी साधारण २९० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे काम सुरू केल्यानंतर शिवाजीनगर, खडकी, हडपसर येथून काही गाड्या सोडाव्या लागणार आहेत. त्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाकडून हडपसर येथून सहा मार्चपासून नव्याने दोन गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे - सोलापूर डेमू गाडी हडपसर रेल्वे स्टेशन येथून सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. तर, पुणे - दौंड ही डेमू सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी सुटणार आहे.
दौंड - पुणे डेमू आता फक्त हडपसर रेल्वे टर्मिनलपर्यंतच धावणार आहे. हडपसर टर्मिनल येथून सध्या फक्त हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी धावते. पण, रेल्वे प्रशासनाने हडपसर रेल्वे टर्मिनल येथून काही गाड्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच या नवीन दोन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.