Pune: खेड तालुक्यातील जवानाला देशसेवेत असताना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:59 PM2024-04-01T17:59:00+5:302024-04-01T17:59:26+5:30
शेकडोंच्या जनसमुदायाने साश्रुनयनांनी शहीद जवानाला अखेरचा निरोप दिला...
आळंदी (पुणे) :खेड तालुक्यातील दिलीप मारुती चौधरी या जवानाला भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावत वीरमरण आले. या घटनेमुळे आळंदी, केळगाव, केंदूर, वरुडे, पऱ्हाडवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान शहीद दिलीप चौधरी यांच्यावर केळगाव (ता. खेड) येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडोंच्या जनसमुदायाने साश्रुनयनांनी शहीद जवानाला अखेरचा निरोप दिला.
खेड तालुक्यातील वरुडे गावचे असलेले दिलीप मारुती चौधरी (सध्या रा. केळगाव) हे २००२ सालापासून भारतीय सैन्य दलात हवालदार पदाच्या माध्यमातून देशसेवा करत होते. प्रारंभी दिलीप चौधरी यांनी अरुणाचल प्रदेश येथे सुमारे १८ वर्षांची देशसेवा केली. अरुणाचल प्रदेश येथून पंधरा दिवसांपूर्वीच त्यांची सियाचीन ग्लेशियर येथे बदली झाली होती. दरम्यान सियाचीन भागात ते देशसेवेसाठी रुजू झाले होते. मात्र शनिवारी (दि.३०) हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना वीरमरण आले.
जवान दिलीप चौधरी यांचे पार्थिव सियाचीन येथून केळगाव येथे सोमवारी (दि.१) त्या अंतिम दर्शन व अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. अमर रहे अमर रहे - शहीद दिलीप चौधरी अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देत चौधरी यांची शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. केळगाव येथील स्मशानभूमीत पिंपरी चिंचवड मुख्यालयातील पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली. त्यांनतर महसूल विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके, पोलिस अधिकारी पृथ्वीराज पाटील, जालिंदर जाधव, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, तलाठी राहुल पाटील आदींसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
तद्नंतर शहीद दिलीप चौधरी यांच्या पार्थिवावर असलेला भारत देशाचा ध्वज चौधरी कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. शहीद दिलीप चौधरी यांच्या पाठीमागे आई, पत्नी चित्रा चौधरी, मुलगी नम्रता व नयना चौधरी तसेच सासरे जालिंदर साहेबराव पऱ्हाड असा परिवार आहे.