उद्योगांना त्रास देणारी गुन्हेगारी मोडून काढू- अंकित गोयल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:00 PM2023-01-09T15:00:09+5:302023-01-09T15:01:26+5:30

तंत्रज्ञानाचा वापर करून खंडणी उकळण्यासारखे प्रकारही उघड...

pune sp ankit goyal said We will crack down on crime that plagues industries | उद्योगांना त्रास देणारी गुन्हेगारी मोडून काढू- अंकित गोयल

उद्योगांना त्रास देणारी गुन्हेगारी मोडून काढू- अंकित गोयल

googlenewsNext

पुणे : उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार असतानाच पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीत गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. हाच चिंतेचा विषय ठरत आहे. उद्योजकांना स्थानिक गुन्हेगारांकडून तसेच गुंडांकडून वारंवार त्रास दिला जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून खंडणी उकळण्यासारखे प्रकारही घडत आहेत.

या पार्श्वभूमीवर एमआयडीसी भागातील गुन्हेगारांवर मोक्का आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले. उद्योजक आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. याबद्दल 'लोकमत'शी बोलताना गोयल यांनी कठोर उपाययाेजना करणार असल्याचे स्पष्ट केले. याच विषयावर गोयल यांच्याशी बातचीत केली.

ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना कोणती आव्हाने आहेत?
- शहरांबरोबर आता ग्रामीण भागातही सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी ‘सायबर सुरक्षा दिंडी' सुरू केली. या दिंडीत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येेते. नागरिकांनीही त्यांचे बँकेचे डिटेल्स, मोबाईलवर येणारे ओटीपी किंवा इतर पासवर्ड कुणालाही शेअर करू नये. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे तरुण वर्गात (वय १५ ते १७) गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावर इतर मोठ्या गुन्हेगाराला फॉलो करणे तसेच हिंसा दाखवणारी स्टेटस ठेवणे, स्थानिक भागात स्वतःला डॉन म्हणवून घेऊन गुन्हे करणे याचे प्रमाण वाढले आहे. यातील बरीच मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. ट्रॅफिक जॅम, वाढत्या चोरींचे प्रमाण हे देखील आव्हान आहे.

एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी कशी रोखणार?

- जिल्ह्यातील महत्त्वाच्या एमआयडीसीत बाहेरचे किंवा स्थानिक उद्योजकांना 'फ्री अँड फेअर' बिजनेस करता यावा, ज्याच्यासोबत व्यवहार करायचा आहे त्याच्याशीच करता यावा, यासाठी सगळ्या एमआयडीसीमध्ये बैठका घेणार आहोत. नियमितपणे बैठका घेऊन तिथल्या अडचणी जाणून घेतल्या जातील. एमआयडीसीतील सर्व गुन्हेगारांचे जुने रेकॉर्ड काढण्यात आले आहेत. या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त मोक्का आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहोत. यापुढे कोणत्याही उद्योजकाला विनाकारण त्रास दिला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

नवीन वर्षात प्राधान्याने कोणत्या गोष्टींवर लक्ष असणार?

नागरिकांमध्ये भीती पसरवणारे गुन्हे कमी करण्याला पहिले प्राधान्य असेल. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार उपलब्ध मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल करणार आहोत. कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यावेळी नवीन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. ड्रोनला स्पीकर लाऊन नागरिकांना सूचना देण्याचा प्रयोग यंदा प्रथमत:च केला होता. पोलिस यंत्रणेत तंत्रज्ञानाचा वापर करणे हे एक प्राधान्य असेल.

ग्रामीण नागरिकांकडून आपल्या अपेक्षा काय?
पोलिसांच्या सूचना सर्वांनी पाळल्या पाहिजेत. पोलिस हे तुमचे मित्र आहेत, या भावनेने त्यांनी आमच्याकडे आले पाहिजे. नागरिकांनी न घाबरता पोलिस स्टेशनमध्ये यावे. त्यांच्या अडचणी पोलिसांना सांगाव्यात. पोलिस ठाण्यात कोणी तुमच्या तक्रारीला दाद दिली नाही तर त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क करावा. तसेच ११२ या नंबरवर अडचणी सांगाव्यात.

Web Title: pune sp ankit goyal said We will crack down on crime that plagues industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.