पुणे : विद्यार्थ्यांचे जेवणच केले बंद, समाजकल्याण वसतिगृह : ठेकेदारांचा असहकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:52 AM2017-12-19T02:52:20+5:302017-12-19T02:52:37+5:30
समाजकल्याण विभागाच्या शहर व जिल्ह्यातील पाच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचे जेवण सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला. अनेक महिन्यांपासून शासनाने देणी अदा न केल्याने हा असहकार केल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे आबाळ झाले.
पुणे : समाजकल्याण विभागाच्या शहर व जिल्ह्यातील पाच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचे जेवण सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला. अनेक महिन्यांपासून शासनाने देणी अदा न केल्याने हा असहकार केल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे आबाळ झाले.
पुणे विभागातील ६० हून अधिक वसितगृहांचा ठेका एका कंपनीकडे आहे. या कंपनीकडून अन्य ठेकेदारांना ठेका देण्यात आला असून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते. तीन ठेकेदारांनी पाच ते सहा वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जेवणच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चांडोली राजगुरूनगर येथील मुलींची निवासी शाळा, मुलांचे वसितगृह तसेच शिरूर येथील मुलींचे वसतिगृह, येरवडा येथील मुले व मुलींचे वसतिगृह येथील जेवण सोमवारी बंद करण्यात आले. येरवडा येथील वसतिगृहात सायंकाळी केवळ वरण-भात देण्यात आला. याबाबत माहिती देण्यास समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी असमर्थता दर्शविली.
पाठपुरावा करूनही टाळाटाळ-
पुरवठादार म्हणून ३० जूनपर्यंत आमच्याकडे ठेका होता. पण त्यानंतर शासनाकडून हा ठेका पूर्ववत करण्यात आलेला नाही. तेव्हापासूनची देणीही रखडली आहेत. ठेका पूर्ववत झाल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे अधिकाºयांकडून सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असे जितेंद्र मगर व दत्ता कोल्हे या ठेकेदारांनी सांगितले.