पुण्याच्या जुईची आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा; पार्किंसन्स आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी तयार केलं 'हे' उपकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:51 PM2022-01-25T15:51:32+5:302022-01-25T15:51:41+5:30
जुईच्या या नवसंशोधनाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुणे : आपल्या काकांना तब्बल आठ वर्षे पार्किंसन्स आजाराशी झुंजताना पाहून पुण्याच्या जुई केसकर हिने त्यावरच संशोधन केले. या रुग्णांसाठी ‘जे ट्रेमर थ्रीडी’ नावाचे नावीन्यपूर्ण वेअरेबल ट्रेमर प्रोफाइलिंग उपकरण तयार केले. त्याचप्रमाणे जगभरात पार्किंसन्स आजाराबाबत सुरू असलेल्या संशोधनाबाबत आणि त्यावरील उपचारासंदर्भातील माहिती देणारे ऑनलाइन बुलेटिन सुरू केले. जुईच्या या नवसंशोधनाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
जुई केसकर ही इयत्ता दहावीत असून, सध्या पुण्यातील बाणेर येथे द ऑर्किड स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच तिला संशोधनाची आवड आहे. एकत्रित कुटुंबात राहत असल्याने तिच्या काकांना झालेला पार्किंसन्स आजार तिने जवळून पाहिल्याने त्याच विषयाचा सखोल अभ्यास केला. अवघ्या पंधरा वर्षांच्या वयात तिने नावीन्यपूर्ण वेअरेबल ट्रेमर प्रोफाइलिंग उपकरण तयार करून त्याचे पेटंट दाखल केले आहे. हे उपकरण हातमोजे स्वरूपातील असून प्रत्येक अंगाच्या थ्रीडी हालचाली कॅप्चर करते. शरीराच्या थरकापांचे प्रोफाइल तयार करून विश्लेषणासाठी क्लाऊड डेटाबेसकडे पाठवते.
जुईने तयार केलेल्या उपकरणामुळे शरीराच्या थरकाप प्रोफाइलचे प्रतिनिधित्व करणारा मार्ग सापडला आहे. तिने केलेल्या या संशोधनास न्यूरोलॉजिस्टकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्याचा वापर रुग्णांना करता येईल. भारतात पार्किंसन्स आजाराबाबत कमी माहिती असल्याने तिने जगभरात या आजाराबाबत सुरू असलेल्या संशोधनाबाबत बुलेटीन सुरू करून रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
जुईचे वडील आयआयटी इंजिनिअर असून सध्या ते जर्मनीमध्ये आर्टिफिशिअल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करतात. जुईची आई गृहिणी आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपल्या कुटुंबीयांना दिले आहे. जुईने आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार व दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.