सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुणेरी पगडीवरुन गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 12:04 PM2019-01-11T12:04:58+5:302019-01-11T12:18:52+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात निदर्शने करण्यात आली.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात निदर्शने करण्यात आली. कुलगुरू डॉ. नितीन करमलकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत विद्यार्थी सभामंडपात शिरले.
यंदापासून विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे असा ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. या बदलला लोकतांत्रिक जनता दल, एनएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.
सभागृहात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सभामंडपामध्ये तणावाचे वातावरण आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेसकोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थी तर जुनाच काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचे चित्र दिसून आले.