Pune| राजुरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 01:19 PM2022-02-16T13:19:01+5:302022-02-16T13:23:31+5:30
मंगळवारी रात्री नऊ वाजण्याचे वेळेस वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला...
राजुरी (पुणे): राजुरी (ता. जुन्नर) शिवारातील गोगडी मळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (दि. 15) रात्री नऊच्या सुमारास मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला. याबाबत माहिती अशी राजुरी शिवारातील गोगडी मळा परिसरातील दुर्गामातानगर येथे शनिवारी सकाळच्या सुमारास उमेश नायकवाडी यांच्या शेतात सव्वा वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.
यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्यांचा वावर असलेल्या या परिसरात स्थानिक ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने बिबट्या मृतावस्थेत आढळून आलेल्या या परिसरातच पिंजरा लावला होता.
दरम्यान मंगळवारी रात्री नऊ वाजण्याचे वेळेस वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला. ही घटना नितीन औटी, आनंद नायकोडी, संजय नायकोडी, समीर औटी, तुकाराम औटी यांना निदर्शनास आली. यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली.
आळे वनपरिक्षेत्राचे वनपाल संतोष साळुंके वनरक्षक त्र्यंबक जगताप, स्वप्नील हाडवळे हे घटनास्थळी आले. रात्रीच्या वेळेसच जेरबंद झालेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे. जेरबंद झालेला बिबट्या मादी जातीचा चार वर्षे वयाचा असल्याचे वनपाल संतोष साळुंखे यांनी सांगितले.