बसमध्ये बाटल्या, कंडोम अन् साडीदेखील! स्वारगेट बस स्थानकावर नेमके चालते तरी काय? राजकीय कार्यकर्त्यांच्या धाडीत सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 07:39 IST2025-02-27T07:38:47+5:302025-02-27T07:39:15+5:30

Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: नागरिकांमध्ये संताप : बंद बसमध्ये चालते तरी काय? पुण्यातील स्वारगेट हे बसस्थानक आहे की अवैध धंद्यांचा अड्डा ?

Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: Bottles, condoms and even sarees in the bus! What exactly is going on at Swargate bus station? Found in a raid by political activists | बसमध्ये बाटल्या, कंडोम अन् साडीदेखील! स्वारगेट बस स्थानकावर नेमके चालते तरी काय? राजकीय कार्यकर्त्यांच्या धाडीत सापडले

बसमध्ये बाटल्या, कंडोम अन् साडीदेखील! स्वारगेट बस स्थानकावर नेमके चालते तरी काय? राजकीय कार्यकर्त्यांच्या धाडीत सापडले

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकात अनेक एसटी बसेस धूळखात पडून आहेत. घटनेनंतर राजकीय कार्यकर्त्यांनी या बसेसची पाहणी केली. त्यावेळी अनेक बसेसमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमच्या पाकिटांचा खच पडल्याचे उजेडात आले. यावरूनच हे बसस्थानक आहे की अवैध धंद्यांचा अड्डा, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे.

शहरातील स्वारगेट आणि छत्रपती शिवाजीनगर या दोन्ही बसस्थानकांचा परिसर मोठा आहे. तुलनेने या परिसरात हायमास्ट दिव्यांची कमतरता असल्याने बऱ्याच परिसरात अंधार असतो. याच संधीचा फायदा घेत सराईत गुन्हेगारांचा येथे सुळसुळाट झाला आहे. या ठिकाणी दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. शिवाय सध्या महिला प्रवाशांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्याचाच फायदा गुन्हेगार घेतात.

सुरक्षारक्षक करतात काय?
प्रवाशांची आणि एसटीच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. परंतु आगारातील बंद शिवशाही बसमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमची पाकिटे सापडल्याने सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षारक्षक नेमके करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

सविस्तर अहवाल द्या, पोलिस अधिकाऱ्यांना सूचना
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी बुधवारी दुपारी स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. बसस्थानकात वावरताना महिला, मुलींनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, कोणतीही समस्या असेल तर स्थानकप्रमुख किंवा एसटीचे जे अधिकारी उपस्थित असतील त्यांच्याशीच थेट संपर्क साधावा, असे आवाहन रूपाली चाकणकर यांनी केले.

उद्धवसेनेकडून स्थानकात तोडफोड
उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकात जाऊन तोडफोड केली व प्रशासन तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघातच ही घटना घडल्याने राज्य सरकारचा तीव्र निषेध केला.
या परिसरात दोन वर्षे महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या बसस्थानकातील सर्व व्यवस्थाच बिघडली आहे. प्रामुख्याने स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र कोणाचेच स्थानकाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही. प्रशासन त्यांना जमेल त्याप्रमाणे कामकाज पाहत असते, अशा तक्रारी प्रवाशांकडून होत आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली प्रकरणाची दखल
राष्ट्रीय महिला आयोगाने घटनेची दखल घेतली आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई, महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे दिले आहेत.
अत्याचार करून गाठले घर : 3 अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा त्याच्या गुनाट येथील घरी गेला होता. गुन्हा दाखल होईल या भीतीने तो पळून गेला. दत्तात्रयचे लग्न झाले असून, आई-वडील, बायको, मुलगा, मुलगी आणि लहान भावासोबत तो राहतो.
या घटनेचे फलटणमध्येही तीव्र पडसाद उमटले. मराठा क्रांती मोर्चा, महात्मा फुले विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, तालुका ओबीसी संघटना, समता परिषद यांच्यातर्फे गुरुवारी निषेध मोर्चा काढला जाणार आहे.

Web Title: Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: Bottles, condoms and even sarees in the bus! What exactly is going on at Swargate bus station? Found in a raid by political activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.