‘पुणे-तळेगाव’ पुन्हा सुरू करावी : प्रवाशांची मागणी; लोकल बंदच्या निर्णयावर संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:53 PM2017-12-06T16:53:13+5:302017-12-06T16:57:16+5:30
पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. याबाबत संपात व्यक्त केला जात असून लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
पुणे : पुण्यातून तळेगावला रात्री उशीरा सुटणारी लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. रेल्वे ही केवळ नफा मिळविण्यासाठी चालविली जात नाही. तसेच एकदा सुरू केलेली सुविधा नफा मिळत नसल्याने बंद करणे योग्य नाही. त्यामुळे प्रवाशांकडून संपात व्यक्त केला जात असून रात्री धावणारी पुणे-तळेगाव लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
प्रवासी नसल्याने होणारा तोटा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दररोज रात्री ११ वाजता पुणे स्टेशनपासून तळेगावपर्यंत धावणारी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच रात्री पर्यायी गाड्या असल्याने प्रवाशांची अडचण होणार नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. तसेच गाड्या बंद करून प्रवाशांची गैरसोय करू नये, अशी मागणी प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे.
पुणे स्टेशनवरून तळेगावपर्यंत रात्री ११ वाजता आणि तळेगावपासून पुणे स्टेशनपर्यंत रात्री ११.५० वाजता लोकल ही रिकामी धावते. परिणामी रेल्वेचा तोटा होतो. तसेच रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांना रेल्वेमार्ग रिकामा मिळावा, यासाठी बुधवारपासून ही लोकल बंद करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, प्रवासी संघटना सदस्य पंकज ओस्वाल आणि क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य विकास देशमुख यांच्यासह इतरही प्रवाशांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.
पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय पूर्णपणे चूकीचा आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शनिवारी व रविवारी गर्दी नसलेल्या दिवशी सर्व्हेक्षण केले जाते. त्यावर गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. एखाद्या गाडीतून १० ते १५ टक्के प्रवासी प्रवास करत असली तर नियमानुसार अशी गाडी बंद करता येत नाही. तसेच रात्री ११ वाजल्यानंतर पुणे ते तळेगाव दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणारी एकही गाडी नाही. त्यामुळे रात्री प्रवास करणा-या प्रवाशांचे हाल होणार आहेत. ११ वाजता लोकला प्रवासी नसतील तर साडे नऊ किंवा दहा वाजता गर्दीच्या काळात ही लोकल सुरू करावी. लोकल बंद करणे हा पर्याय असू शकत नाही.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप
रेल्वे नफा मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही. पुणे-तळेगाव लोकल बंद केल्याने रात्री उशीरा कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच ज्या गाड्यांमुळे नफा मिळतो तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे नफा मिळत नाही म्हणून लोकल बंद करणे चूकीचे आहे.
- पंकज ओस्वाल, सदस्य, प्रवासी संघटना
एकदा सुरू केलेली सुविधा अचानक बंद करणे चुकीचे आहे. कोणतीही गाडी बंद करण्यापूर्वी एक महिना त्याबाबतचा आढावा घेणे आवश्यक आहे. रात्री उशीरा पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ११ वाजताची लोकल उपयुक्त होती. लोकलला गर्दी नसेल तर तिच्या वेळेत बदल करता येऊ शकतो. मात्र, रेल्वे बंद करून रेव्ले प्रशासनाने प्रवाशांचा संताप ओढवून घेतला आहे.
- विकास देशपांडे, सदस्य, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती