पुणे टेस्टी कट्टा! खमंग अन् खुशखुशीत पुण्यातील परदेशी वाणाचा देशी साबुदाणा वडा
By राजू इनामदार | Published: August 8, 2022 07:05 PM2022-08-08T19:05:01+5:302022-08-08T19:05:09+5:30
उपवास नसला तरी जोरदार मागणी
पुणे : एक संपूर्ण रात्र भिजवलेला पांढरा शुभ्र साबुदाणा, त्यात उकडलेल्या बटाटाच्या फोडी, शेंगदाण्याचे कुट, हिरव्या मिरचीचे दिसतील न दिसतील असे तुकडे, मीठ, पाहिजेच असेल तर थोडी साखरही. हे सगळे मिक्स करायचे. तळहाताच्या मध्यभागावर एक गोळा घ्यायचा. तो तिथल्यातिथेच नीट घोळवायचा व हलक्या हाताने कढईत उकळत असलेल्या तुपात सोडायचा. तांबूस सोनेरी रंग आला की काढून घ्यायचा.
किसलेली काकडी किंवा गोडसर दह्यांबरोबर खायचे. या वेळी हात, तोंड, भाजणारी जीभ यांची जी काही धावपळ चालते ती बघावी अशीच. त्यातही पुन्हा चार-दोन साबुदाण्यांचा एखादा गरम तुकडा टाळ्याला वगैरे चिकटला की मग सांगायची सोय नाही.
सोनेरी रंगाने झगमगणारा हा पदार्थ खायची नेमकी अशी दोन-तीनच ठिकाणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे केसरी वाड्यासमोरचे प्रभा विश्रांती गृह. या साबुदाणा वड्याला सन १९४० पासूनची परंपरा आहे. परांजपे काकूंच्या हाताला चव आहे. अजूनही ते स्वत: साबूदाणा वड्याची सगळी उस्तवार करतात. तळणारे आहेत वेगळे; पण मसाला आणि प्रत्यक्ष वड्याची बांधणी मात्र काकूंच्याच हातची. दुसरे ठिकाण आहे ते नेहरू चौकात. बोहरी आळीच्या अगदी सुरुवातीच्या चौकातच. साधी गाडीच आहे; पण त्यांची कढई व त्यात उकळत्या तुपात डुंबणारे साबुदाणे वडे पाहिले तरी थक्क व्हायला होते.
प्रभामध्ये वड्याबरोबर काहीच मिळत नाही, या गाडीवर मात्र भरडलेल्या हिरव्या मिरचीत किसलेल्या काकडीची दही घातलेली चटणी देतात. दोन्हीकडच्या तळलेल्या साबुदाणा वड्यांचा आकार करकटकाने मोजून पाहावा. बरोबर वर्तुळच. थोडेही बिघडणार नाही. खायला एकदम खुसखुशीत. त्यातही चटणीबरोबर खायला अधिक मजा. त्यामुळेच की काय उपवास नसतानाही खाणाऱ्यांची संख्या बरीच मोठी.
उपवासाला चालणाऱ्या या पदार्थातील साबुदाणा व बटाटा या दोन्ही गोष्टी चक्क परदेशी आहेत. दोन्हीही कंद वर्गातील पिके. सन १५३० मध्ये पोर्तुगिजांनी भारतात बटाटा आणला. साबुदाणा तयार करण्याचा कारखाना निघाला १९४४ मध्ये, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. ते काहीही असो. दोन्हीचे मिश्रण होऊन तयार होणारा पदार्थ श्रावणातील उपवासांची मौज वाढवतो हे मात्र नक्की.
कुठे : प्रभा विश्रांतीगृह, नेहरू चौक
कधी : प्रभात उपवासाच्या दिवशी, नेहरू चौकात जवळपास दररोज