Pune: दोघांचा जीव घेणाऱ्या 'त्या' धनाढ्याच्या मुलाला अपघात विषयावर निबंध लिहावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:08 PM2024-05-19T22:08:26+5:302024-05-19T22:08:49+5:30

Pune Accident News: दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला आज बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. सोबतच न्यायालयाने या मुलाला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. याशिवाय अपघात या विषयावर निबंध लिहीण्याची अट घातली आहे. तो आता येरवडा वाहतूक विभागासोबत याठिकाणी वाहतूक नियम करणार आहे.

Pune: The son of 'that' rich man who took two lives will have to write an essay on the subject of an accident | Pune: दोघांचा जीव घेणाऱ्या 'त्या' धनाढ्याच्या मुलाला अपघात विषयावर निबंध लिहावा लागणार

Pune: दोघांचा जीव घेणाऱ्या 'त्या' धनाढ्याच्या मुलाला अपघात विषयावर निबंध लिहावा लागणार

- किरण शिंदे 
शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एक भीषण अपघात झाला. या अपघातात आयटी इंजिनियर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (वय २४, रा. पुणे, मुळ. मध्यप्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांच्या दुचाकीला पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत असलेल्या आलिशान पोर्शे कारणे धडक दिली होती. दरम्यान दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला आज बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. सोबतच न्यायालयाने या मुलाला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. याशिवाय अपघात या विषयावर निबंध लिहीण्याची अट घातली आहे. तो आता येरवडा वाहतूक विभागासोबत याठिकाणी वाहतूक नियम करणार आहे.

दरम्यान, अल्पवयीन असलेला हा मुलगा शनिवारी रात्री पोर्शे ही महागडी कार घेऊन मित्रांसोबत बाहेर पडला होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले. ताशी 200 किमी वेगाने असलेली त्याची कार अनिस आणि अश्विनी असलेल्या दुचाकीला धडकली. यामध्ये दुचाकी वर पाठीमागे बसलेली अश्विनी हवेत फेकली गेली. नंतर जमिनीवर आदळल्याने तिचा मृत्यू झाला. तर अनिश याला देखील जबर मार लागल्याने त्याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर अल्पवयीन कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. 

दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भादवी कलम ३०४ (अ) नुसार कलम लावले. तर, मोटार वाहन कायद्यानेही गुन्हा नोंद केला. येरवडा पोलिसांनी त्याला आज सुट्टीच्या बाल न्यायालयात हजर केले. तसेच, त्याची पोलीस कोठडी देखील मागितली. परंतु, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला काही अटी व शर्तीवर जामीन दिल्याचे मुलाचे वकिल ऍड. प्रशांत पाटील यांनी सांगितले. या मुलाने पंधरा दिवस येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पोलिसांसोबत काम करावे. तसेच, अपघात या विषयावर निबंध लिहावा असे न्यायालयाने जामीन देताना म्हंटले आहे. तर, मुलाने दारू सोडण्यासाठी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार व समूपोदेशन घ्यावे, असेही म्हंटले आहे. या सर्व बाबीनंतर पोलिसांनी त्याचा अहवाल न्यायालयात सादर करायचा आहे.

पालकावर गुन्हा दाखल 
अपघाताच्या प्रकरणात कार चालविणाऱ्या मुलावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, तो अल्पवयीन असूनही त्यास पबमध्ये दारू विक्री करणाऱ्या पब चालकावर आणि मुलाला गाडी देणाऱ्या पालकांवर बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

Web Title: Pune: The son of 'that' rich man who took two lives will have to write an essay on the subject of an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.