पुण्यात लाखामागे केवळ १६८ पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:08+5:302021-02-23T04:15:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सुरक्षित शहर, आयटी हब, शैक्षणिक सुविधा आणि त्याचबरोबर रोजगाराची वाढती संधी, यामुळे पुण्यात देशभरातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सुरक्षित शहर, आयटी हब, शैक्षणिक सुविधा आणि त्याचबरोबर रोजगाराची वाढती संधी, यामुळे पुण्यात देशभरातून लोकांचा ओघ सुरू असतो. त्यामुळे देशातील सर्वाधिक नागरीकरण होणारे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. शहरातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढत आहे. त्याचा संपूर्ण ताण पोलीस दलावर येत आहे. पुणे शहराची लोकसंख्या आता ४५ लाखांच्या पुढे गेली आहे. पुण्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १६८ पोलीस आहेत.
राज्य शासनाकडून दोन टप्प्यांत १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले होते. जगभरातील देशांचा विचार केल्यास लोकसंख्या आणि पोलीस यांच्या प्रमाणात भारत तळातील पाच देशांमध्ये आहे.
पुणे शहर पोलीस दलात पुणे ग्रामीण पोलीस दलातील दाेन पोलीस ठाणी समाविष्ट होत आहेत. त्याचबरोबर पुणे शहरात आणखी ६ नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची गरज भासणार आहे. सध्या पुणे शहर पोलीस दलात ८ हजार ४०० पोलीस कर्मचारी आहेत. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे नवीन भरती झालेली नाही. असे असताना दर महिन्याला साधारण ३० ते ३५ अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असतात. पण नवीन भरती होत नसल्याने या जागा रिक्त राहतात. वर्षभरातून एकदा भरती होत असली तरी त्यातून काहीसे कर्मचारी पुणे शहराला मिळतात. त्याचवेळी जेवढे कर्मचारी मिळतात, जवळपास तेवढेच कर्मचारी वर्षभरात निवृत्त झालेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत मामुली वाढ होताना दिसते.
--------------
१२ तास ड्युटीमुळे पोलिसांवर ताण
शहरातील राहण्याचे ठिकाणापासून कामाचे ठिकाणाचे अंतर वाढत चालले आहे. त्यात शहरातील उपनगरांतील गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. पोलिसांना १२ तासांची ड्युटी असली तरी कोणालाही १२ तासांनंतर घरी जाण्यासाठी मिळेल, याची खात्री नसते.
----------------
देशात पुणे १४ व्या क्रमांकावर
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१९ च्या अहवालानुसार देशातील मेट्रो शहरांमधील सर्व गुन्ह्यांचा विचार करता १९ प्रमुख शहरांमध्ये पुणे शहर हे १४ व्या क्रमांकावर येते. पुणे, बंगळुरू हे आयटी शहर असले तरी पुणे शहरापेक्षा बंगळुरूमध्ये दुप्पट गुन्हे दाखल होत असल्याचे दिसून येते.