दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात तिसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 06:13 PM2018-07-23T18:13:50+5:302018-07-23T18:18:37+5:30
राज्यात ३४ जिल्ह्यात १४ जुलै रोजी महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ७ लाख ७७ हजार खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते.
पुणे : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येत असलेल्या महालोक अदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यात ३४ जिल्ह्यात १४ जुलै रोजी महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ७ लाख ७७ हजार खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ५५ हजार ६८८ दावे निकाली काढण्यात आले. दावे निकाली काढण्यात सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सातारा जिल्ह्यात ८० हजार ८६७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २९ हजार ७०३ दावे निकाली काढण्यात आले. तर नाशिक जिल्हाने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तेथे १ लाख २९ हजार १९३ पैकी २७ हजार ४७ दावे निकाली निघाले. त्यानंतर तिसरा क्रमांक पुणे जिल्ह्याचा लागला. पुण्यात ६५ हजार १४७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २५ हजार ७६५ दावे निकाली काढण्यात आले. निकाली काढलेल्या दाव्यात २३ हजार १४२ दावे दाखलपूर्व आहेत. तर, २ हजार ६२३ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. यात २० कोटी ३५ लाख ८३ हजार ६८३ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. दाखलपूर्व आणि प्रलंबित असे दोन प्रकारचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली.