पुण्यात सप्टेंबर महिन्यात १८९६ नंतरचा तिसरा भयंकर पाऊस; ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:03 PM2024-09-27T13:03:06+5:302024-09-27T13:03:30+5:30
शहरात २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर २६ सप्टेंबर १९७१ मध्ये ११५.३ मिलिमीटर पाऊस पडला
पुणे: भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मान्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला आहे. या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दैना उडाली होती.
काय घडले?
केवळ दोन तासांत १२४ ‘मिमी’ची नोंद
हवामान विभागाने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नोंदविलेल्या आकडेवारीनुसार शिवाजीनगर येथे केवळ दोन तासांत तब्बल १२४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली; तर चिंचवड येथे १२७ मिलिमीटर, वडगावशेरीत ७१, तर कोरेगाव पार्कमध्ये ६३ मिलिमीटर पाऊस पडला.
रेड अलर्ट प्रत्यक्षात उतरला
भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी पुण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, दुपारनंतर ढगांची स्थिती पाहता, यात बदल करून रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि हा रेड अलर्ट प्रत्यक्षातही उतरला. शहरात दुपारपासूनच काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली होती. सुमारे साडेतीनच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याची तीव्रता वाढत गेल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले होते.
ढगफुटी नव्हे, पण ढगफुटीसदृश पाऊस
हवामान विभागाच्या गृहितकानुसार एका तासात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास ढगफुटी झाली असे समजले जाते. मात्र, शहरात बुधवारी झालेला हा पाऊस सुमारे दोन तासांमध्ये झाल्याने ही ढगफुटी नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे आणखी सात मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात येऊन एकूण पाऊस १३१ मिलिमीटर झाला. रात्रभरात केवळ हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये शिवाजीनगर येथे तब्बल १३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. चिंचवड येथेही एवढाच अर्थात १३३ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला.
आजवरचा तिसरा विक्रमी
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे उपलब्ध असलेल्या १८९६ पासूनच्या आकडेवारीनुसार बुधवारी झालेला हा पाऊस पुण्यातील आजवरचा सर्वाधिक तिसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. यापूर्वी ५ ऑक्टोबर २०१० मध्ये तब्बल १८१.१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतरचा दुसरा सर्वाधिक पाऊस १७ ऑगस्ट १९८७ रोजी १४१.७ मिलिमीटर इतका पडला होता. त्यानंतर बुधवारी झालेला पाऊस १३३ मिलिमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. या पावसामुळे शिवाजीनगर, पेठांचा भाग तसेच शहराच्या पूर्वेकडील भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली. परिणामी पुणेकरांची चांगलीच दैना उडाली. त्यामुळे २०१० मध्ये झालेल्या पावसाची तुलना बुधवारी झालेल्या पावसाशी केल्यास त्या दिवशी काय स्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी.
८६ वर्षांनंतर मोडला सप्टेंबरचा विक्रम
हा पाऊस केवळ तिसरा विक्रमीच नव्हता, तर केवळ सप्टेंबर महिन्याची स्थिती बघता या पावसाने ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडला आहे. शहरात २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २६ सप्टेंबर १९७१ मध्ये ११५.३ मिलिमीटर पाऊस पडला होता.
पुण्यातील आजवरचा विक्रमी पाऊस
तारीख पाऊस (मि.मी.मध्ये)
५.१०.२०१० १८१.१
१७.०८.१९८७ १४१.७
२६.०९.२०२४ १३३
२१.०९.१९३८ १३२.३
२६.०६.१९६१ १३१.९
सप्टेंबर महिन्यातील आजवरचा पाऊस
तारीख पाऊस (मि.मी.मध्ये)
२६.०९.२०२४ १३३
२१.०९.१९३८ १३२.३
२६.०९.१९७१ ११५.३
१९.०९.१९८३ ११०.७
१२.०९.१९८४ ८८.३