Pune: आळंदीत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; संबंधित संस्था चालक महाराज गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 09:47 PM2024-01-26T21:47:48+5:302024-01-26T21:48:03+5:30
Pune News: तीर्थक्षेत्र आळंदीतील एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित संस्था चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
-भानुदास पऱ्हाड
आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदीतील एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित संस्था चालकास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेबाबत आळंदी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.आळंदी पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी केलेल्या तक्रारीवरून दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर - आळंदीकर (वय ५२) याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित वारकरी संस्था ही खूप जुनी असून अलीकडेच ती नोंदणीकृत देखील झाली आहे. मृदुंग वादनाच्या शिक्षणासाठी ही संस्था प्रसिद्ध असून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
दरम्यान या प्रकारामुळे आळंदी परिसरात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.