Pune: सातारा रस्ता बीआरटी मार्गात बर्निंग कारचा थरार; चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:47 PM2023-08-12T23:47:13+5:302023-08-12T23:47:39+5:30
Pune: पुणे सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील पद्मावती बस स्थानका जवळ शनिवारी (दि. १२) सायंकाळी आठच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चालत्या मोटारीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात मोटार जळून खाक खाली.
- पांडुरंग मरगजे
धनकवडी - पुणे सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील पद्मावती बस स्थानका जवळ शनिवारी (दि. १२) सायंकाळी आठच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चालत्या मोटारीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात मोटार जळून खाक खाली. सुदैवाने मोटारीतून प्रवास करणारे पती-पत्नी दोघे हि सुखरूप असून त्यांना कुठलीही इजा झाली नाही विनायक लिलाधर जाखोटीया, (वय ३० वर्षे,) व पत्नी अवनी जाखोटीया ( रा. मुरमाड, कल्याण ) अशी गाडीतून प्रवास करणाऱ्या पती पत्नी ची नावे होत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्विप्ट डिजेल एमएच ०५, डीएच ५५३१ या क्रमांकाची पुणे सातारा रस्ता मार्गे कल्याणच्या दिशेने चाललेली मोटार पद्मावती जवळ पोहचली असता या मोटारी मधून वास येत असल्याची बाब मोटार चालकाच्या लक्षात आली त्याने समयसुचकता आणि प्रसंगाव धान राखत मोटार बाजूला घेत स्वतः सह पत्नी ला खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली.
मोटारीतील दोघेही खाली उतरताच मोटारीने मोठा पेट घेतला. बघता-बघता मोटार जळून खाक झाली दरम्यान पोलिसांनी पाचारण केलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझवली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मोटाररस्त्या च्या बाजूला करून घेत वाहतूक पूर्ववत केली. या आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आगीचे आणि धुराचे मोठाले लोळ परिसरात पसरले होते तर बघ्यांच्याही मोठी गर्दी झाली होती.
रक्षाबंधन ठरले जीवनरक्षक
रक्षाबंधनाचा धागा नाजूक रेशमाचा असला तरी त्यामध्ये जीवन रक्षणाचे सामर्थ्य असते. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून बांधला जाणारा हा रेशीमबंध प्रसंगी भावाचेसुद्धा प्राणरक्षण करू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला. कल्याण येथील रहिवासी विनायक लिलाधर जाखोटीया हे व्यवसायिक असून त्यांच्या पत्नी अवनी सह ते कल्याणवरुन पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम येथे राहणारी आपली बहिण श्रुती विजय भट्टड यांच्याकडे रक्षाबंधनाच्या निमि त्ताने राखी बांधण्यासाठी आले होते कारण त्यांना रक्षाबंधन सणाला कामामुळे पुन्हा येणे शक्य नव्हते. म्हणून ते बहिणीच्या हातून राखी बांधून सायंकाळी कल्याणला परत जात असताना अचानक त्यांच्या चारचाकी गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत ते व त्यांच्या पत्नी वेळीच गाडीतून बाहेर पडल्याने दोघेही बचावले परंतु गाडी मात्र जळून खाक झाली. जोखोटिया कुटुंब बालंबाल बचावले, विनायक जखोटीया म्हणाले, बहिणी ने प्रेमाने बांधलेल्या धागेतील ताकद मला आज जीवनदान देऊन गेली.