पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे सेवा गुरुवारपासून अंशत: सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:46 PM2022-01-25T17:46:02+5:302022-01-25T17:50:49+5:30
गुरूवारपासून पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फेऱ्या केल्या जाणार आहेत....
बारामती: कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेली रेल्वेसेवा पुन्हा अंशत: सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. बारामतीकरांच्या आवडीची तसेच सोयीची असणारी प्रवाशीसेवा मात्र सध्या गैरसोयीचीच ठरणार आहे. थेट बारामती-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वेच्या जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार गुरुवारपासून ( दि २७ ) पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फे-या केल्या जाणार आहेत. बारामती पुणे अशी रेल्वे सेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी होती. विशेषत: एसटी संपाच्या सणासुदीच्या काळापासून या मागणीने जोर धरला आहे. ‘मनसे’च्या वतीने अॅड. भार्गव पाटसकर यांनी देखील याबाबत निवेदन देत बारामती-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची काही प्रमाणात दखल घेण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही मागणी पूर्णच झालेली नसून सध्या तरी अंशत: रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गुरुवारपासून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन दहा डब्यांची डेमू रेल्वे सुटेल. ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ती मळदगाव, शिरसाई, कटफळ मार्गे बारामतीत सव्वा दहा वाजता दाखल होईल. हीच गाडी तीन तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी सव्वा एक वाजता दौंडकडे रवाना होईल. दौंडला ही गाडी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे.
बारामतीहून थेट पुण्याला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, हा प्रश्न सध्या तरी निरुत्तरीतच आहे. रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट काढताना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे, १८ वर्षांखालील मुलांना वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. दरम्यान रेल्वेने ही सेवा सुरु करण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.