पुणे विमानतळावर अपघात, १६० प्रवाशांसह दिल्लीला चाललेल्या विमानाला 'पुश बॅक टग' धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:21 AM2024-05-17T10:21:54+5:302024-05-17T10:25:43+5:30
दिल्लीला जाणारे हे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली....
पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या एका विमानाचा अपघात झाला. यामध्ये विमानाला 'पुश बॅक टग' म्हणजेच विमान उडणे किंवा ढकलण्याची वाहन धडकले. या घटनेमध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर विमानाच्या खालच्या बाजूस 'फ्युजलाज'मध्ये मोठे भगदाड पडले होते. तसेच विमानाच्या पंख्यांच्या पत्र्याचे देखील नुकसान झाले. या अपघातामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करावे लागले. अपघातानंतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पण दिल्लीला जाणारे हे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एअर इंडिया फ्लाईट क्रमांक AI 858 गुरुवारी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी दिल्लीसाठी जाणार होते. एरोब्रिजला जोडलेले हे विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. त्याचवेळी अचानक पुश बॅक टगची मोठी धडक विमानाच्या खालच्या बाजूस लागल्याने विमानाचा पत्रा कापला गेला आणि मोठे भगदाड पडले. हवाई उड्डाण मंत्रालयाच्या विभागातर्फे या घटनेची चौकशी केली जाणार आहे. तसेच चौकशीनंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.
या विमानांमध्ये एकूण १६० प्रवासी होते. ते सर्वजण दिल्लीला निघाले होते विमानाचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज विमानतळ परिसरात झाला. त्यानंतर वैमानिकांनी आणि तांत्रिक टीमने विमानाचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना विमानाच्या पंखांचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले. याच पंखांमध्ये इंधन असते सुदैवाने कोणताही मोठा अवघात न होता सर्वजण सुखरूप बचावले आहेत तसेच विमानाचेही थोडेफार नुकसान झाले.