पुण्यातील वाहतूक हवालदारानं 'मणिके मागे हिथे' चं केलं मराठी व्हर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 01:28 PM2021-10-03T13:28:54+5:302021-10-03T15:26:50+5:30
मराठी व्हर्जन तयार करणारे कुणी मोठे गायक नसून ते पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनचे तरुण ट्रॅफिक हवालदार अतिश खराडे
नितीन गायकवाड
पुणे : 'मनिके मागे हिथे' हे गाणे सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. अनेक सेलेब्रिटींनीही या गाण्याचे कौतुक केले आहे. जगाला वेड लावणाऱ्या गाण्याची देशभर अनेक भाषांतील व्हर्जन्स निघाली आहेत. मग पुणेकर तरी त्यात मागे कसे राहतील. एका पुणेकरानेच या गाण्याचे मराठी व्हर्जन तयार केले आहे. पण मराठी व्हर्जन तयार करणारे कुणी मोठे गायक नसून ते पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनचे तरुण ट्रॅफिक हवालदार अतिश खराडे होय.
या गाण्याची भाषा कुठली सिंहली की तमिळ हेही त्यांना माहीत नाही. पण स्वत:च गाणं एन्जॉय करत तयार केलेल्या या मराठी व्हर्जनने सात दिवसांतच यू ट्युबवर ६० हजारांहून व्ह्यूज मिळवले आहेत. हे ओरिजिनल गाणं आपणही ऐकलं असेल पण शब्द आणि अर्थ समजला नसेलच पण या गाण्याची जादू चालली असेलच. योहानी दिलोका दा सिल्वा या श्रीलंकन गायिकेने गायलेले हे गाणे जगभर व्हायरल होत आहे.
अनेक रॅपरने या गाण्यात आपले स्वर घालून त्यांच्या भाषेत वाढवले आहे. अतिश खराडे यांनी ओरिजिनल गाणे अनेकदा ऐकले व त्यांना खूप आवडले. या गाण्याचे काही स्वत: शब्द बदलून गाण्यामध्ये योहानी हिला गाणे शिकवण्यासाठी पुण्याला येण्यासाठी साद घातली आहे. हा व्हिडीओ मोबाइलवर चित्रीत केला असून अतिश यांनी यात ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश घातला आहे.
बारा तासांची ड्युटी, सणासुदीला सुट्टी नाही, बंदोबस्त असेल तर बोलायलचं नको अशा ताणतणावातही गेली १४ वर्षे त्यांनी जीवनशैलीशी जुळवून घेत गायनाची आवड जोपासली आहे. ते सहकारी पोलिसांचा तसेच मित्रांमध्ये ताण हलका करण्यासाठी मिमिक्रीदेखील करतात. माझ्या मित्रपरिवारात छंद म्हणून गाणे म्हणायचो पण व्यावसायिकपणे गाणे कुठे शिकलो नाही. त्यामुळे अनेक जण कौतुक करताहेत.
'मनिके मागे हिथे' गाण्याचा समाज माध्यमांवर धुमाकूळ; पुण्यातील वाहतूक हवालदारानं तयार केलंय मराठी व्हर्जन, एक झलक पाहाच...#Punepic.twitter.com/sgdgbxwx9x
— Lokmat (@MiLOKMAT) October 3, 2021
लोक ओळखू लागले आहेत...
परिसरातील लोक या व्हायरल गाण्यामुळे ओळखू लागले आहेत. महाराष्ट्रभरातून अनेकजण कॉल, मेसेज करून कौतुक करत आहेत. त्यामुळे माझे कुटुंबही आनंदी आहे. वरिष्ठ अधिकारीदेखील कौतुक करतात, यामुळे हुरूप येतो. वर्दीतल्या अशा कलाकारांसाठी गृहखात्यानं हक्काचं व्यासपीठ निर्माण करावं, अशी अपेक्षा वर्दीतले अनेक कलाकारांची आहे.