बुलेटचा फटाका अाता पडणार महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 08:54 PM2018-08-07T20:54:46+5:302018-08-07T20:56:13+5:30
पुणे वाहतूक शाखेकडून हाती घेण्यात अालेल्या विशेष माेहिमेत बुलेटला माेठा अावाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली आहे.
पुणे : रस्त्यावरुन धकधक अावाज करत जात असताना माेठा फटाक्यासारखा अावज बुलेटमधून काढणं अाता बुलेटप्रेमींना महागात पडणार अाहे. पुणे वाहतूक शाखेकडून बुलेट माेटारसायकलला बेकायदेशीररित्या वेगवेगळ्या अावाजाचे सायलेन्सर लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असून 6 अाॅगस्ट या एकाच दिवशी राबविण्यात अालेल्या विशेष माेहिमेत अशा 200 वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली अाहे. या वाहनचालकांकडून माेटार वाहन कायदा कलम 198 चा भंग केल्याप्रकरणी 1 लाख 20 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे.
सध्या तरुणांमध्ये बुलेट अाणि इतर स्पाेर्ट बाईक्सची क्रेझ पाहायला मिळते. रस्त्यांवरुन भरधाव दुचाकी चालविण्यात तरुणांना वेगळाच अानंद मिळत असताे. त्यातच लाेकांचे अापल्याकडे लक्ष वेधावे यासाठी अनेक तरुण अापल्या बुलेटला एक विशिष्ट प्रकारचे सायलेन्सर लावतात. जेणेकरुन या सायलेन्सरमधून फटाक्यासारखा अावाज काढता येऊ शकताे. अनेकदा रस्त्यांवर अचानकपणे असा अावाज या सायलेन्सरमधून काढण्यात येताे. या अावाजामुळे इतर वाहनचालकांना दचकायला हाेते. अचानक येणाऱ्या अावाजामुळे एखाद्याचे लक्ष विचलित हाेऊन अपघात घडण्याची सुद्धा शक्यता असते. अशा वाहनचालकांवर अाता चाप बसविण्यासाठी वाहतूक शाखेकडून 6 अाॅगस्ट राेजी विशेष माेहीम हाती घेण्यात अाली हाेती. या दिवशी असे सायलेन्सर लावणाऱ्या 200 वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार 400 रुपये इतका दंडही वसूल करण्यात अाला.
अपघात टाळण्यासाठी तसेच वाहतूकीस शिस्त लावण्यासाठी पुण्याचे नवे पाेलीस अायुक्त व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारताच ही विशेष माेहीम राबविण्याचे अादेश दिले. 6 अाॅगस्ट राेजीच रेसिंग बाईक्स भरधाव वेगाने चालवणाऱ्या 36 वाहनचालकांवर सुद्धा कारवाई करण्यात अाली. त्यांच्याकडून 23 हजार 100 इतका दंड वसूल करण्यात अाला. त्याचबराेबर ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्या 265 वाहनचालकांकडून 42 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात अाला अाहे. वाहतुकीस अडथळा हाेईल अशा ठिकाणी वाहने लावणाऱ्या 418 वाहनांना जॅमर लावून 69 हजार 400 इतकी रक्कम वसूल केली गेली अाहे. ही विशेष माेहीम यापुढेही चालू राहणार असून नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे तंताेतंत पालन करावे असे अावाहन वाहतूक शाखेकडून करण्यात अाले अाहे.