ट्रॅफिक पोलिसांनी त्यालाही उचललं, टेम्पोत टाकलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:36 PM2018-05-31T18:36:05+5:302018-05-31T18:48:23+5:30
एखाद्या वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले किंवा नो पार्कींगमध्ये वाहन लावले तर त्यावर कारवाई म्हणून वाहतुक पोलीस संबंधित वाहनाला उचलून नेण्याचा प्रकार नवीन नाही. पण पुण्यात मात्र गाडीसह चालकालाही टेम्पोत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पुणे : एखाद्या वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले किंवा नो पार्कींगमध्ये वाहन लावले तर त्यावर कारवाई म्हणून वाहतुक पोलीस संबंधित वाहनाला उचलून नेण्याचा प्रकार नवीन नाही. पण पुण्यात मात्र गाडीसह चालकालाही टेम्पोत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नो पार्किंगमध्ये लावलेले जर चालक उपस्थित नसेल तर वाहतूक पोलिसांमार्फत उचलून नेले जाते. मात्र चालक असेल तर तिथेच त्याला दंड ठोठावून वसुली केली जाते. अशावेळी वादाचे प्रसंगही बघायला मिळतात. बुधवारी शहरातील विमाननगर भागात गाडी उचलणाऱ्या टेम्पोमध्ये गाडीसह चालकालाही चढवण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, विमाननगर भागातील लुंकड प्लाझा समोर हा प्रकार घडला. एका पादचा-याने हा प्रकार कॅमे-यात कैद केला आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकीवर बसलेल्या एका युवकाला वाहतूक पोलिसांच्या टेम्पोवरील काही कर्मचारी दुचाकीसह उचलून टेम्पोत टाकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाहतूक पोलिसांच्या या कार्यपध्दतीवर जोरदार टिका होऊ लागली आहे. या विषयावर वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे याच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी याबाबत चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.