वाहतुक पाेलिसांच्या कारवाईचा धडाका, पीएमपी, एसटी बसलासुद्धा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 09:18 PM2018-08-27T21:18:07+5:302018-08-27T21:19:45+5:30
स्वारगेट येथील जेधे चाैकात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई करण्यात अाली अाहे.
पुणे : स्वारगेट येथील जेधे चाैकात हाेणाऱ्या वाहतूककाेंडीच्या पार्श्वभूमिवर वाहतुक विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली अाहे. साेमवारी या चाैकातील वाहतुकीस अडथळा हाेईल अशा प्रकारे थांबलेल्या रिक्षा, माेटारी, खासगी प्रवासी बस यांच्यासह पीएमपी अाणि एसटी बसेसवर कारवाई करण्यात अाली. या कारवाईतून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात अाला.
पाेलिस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी पदभार स्विकारल्यानंतरच वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले हाेते. शहरातील सर्व वाहतुक विभागाकडून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत अाहे. पीएमपी बस रस्त्यावर बंद पडत असल्यामुळे वाहतुक काेंडी हाेत असते. या बंद बडलेल्या बसेसवरदेखील कारवाई करण्याचे अादेश अायुक्तांनी दिले अाहेत. स्वारगेट हे शहरातील महत्त्वाचे ठिकाण असून त्या ठिकाणी माेठ्याप्रमाणावर वाहतूक तसेच नागरिकांची ये जा असते. या ठिकाणी कशाही पद्धतीने लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम हाेत असताे. त्यामुळे स्वारगेट वाहतुक विभागाने मागील काही दिवसांपासून बेशिस्त वाहनचालकांवर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा वाहनांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वारगेट परिसरात जवळपास 50 रिक्षांवर कारवाई केल्यानंतर वाहतुक शाखेने सोमवारीदेखील अशीच कारवाई केली.
स्वारगेट वाहतुक शाखेने सोमवारी बेशिस्तपणे रस्त्यावर किंवा रस्त्यालगत लावलेल्या सुमारे 35 रिक्षांवर कारवाई केली. तसेच, छत्रपती शाहू बसस्थानकासमोर क्रमाने लावलेल्या चार पीएमपीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे त्यांच्यावर आणि जेधे चौकात बंद पडलेल्या दोन पीएमपी बसवर कारवाई केली. त्यासह बंद पडलेल्या एसटीमुळे वाहतुक कोेंडी झाल्यामुळे त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली. स्वारगेट परिसरातून परवानगी नसतानादेखील जाणाऱ्या 2 अवजड वाहनांसह 5 खासगी प्रवासी बसवर कारवाई केली. तसेच, सुमारे 30 दुचाकी वाहनांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमधून सुमारे 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती स्वारगेट वाहतुक विभागाचे पोलिस निरिक्षक संपतराव भोसले यांनी दिली. जेधे चौक आणि परिसरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी येत्या काळात अशाच प्रकारे कठोर कारवाई करणार असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले.