पुणे : बॅटरी चोरणाऱ्या टोळक्यांनी केली ट्रक चालकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:23 AM2018-11-22T09:23:57+5:302018-11-22T09:27:09+5:30

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकची बॅटरी चोरत असताना याला प्रतिकार केल्याच्या कारणावरुन चार ते पाच चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करुन ट्रक चालकाची हत्या केली.

Pune : truck driver brutally murdered by thieves | पुणे : बॅटरी चोरणाऱ्या टोळक्यांनी केली ट्रक चालकाची हत्या

पुणे : बॅटरी चोरणाऱ्या टोळक्यांनी केली ट्रक चालकाची हत्या

Next
ठळक मुद्देट्रकची बॅटरी चोरणाऱ्यांकडून चालकाची हत्याट्रक चालकाच्या छातीत धारदार शस्त्राने केला वारट्रक चालकाची हत्या करुन चोरटे फरार

पुणे : रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकची बॅटरी चोरत असताना याला प्रतिकार केल्याच्या कारणावरुन चार ते पाच चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करुन ट्रक चालकाची हत्या केली. ही घटना पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राबाहेर घडली.
दत्तात्रय गंगाधर भोईटे (वय 40, ) असे हत्या करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय भोईटे हे सोलापूरकडे ट्रक घेऊन जात होते. सोलापूरला जात असताना मध्यरात्री त्यांना झोप आल्याने त्यांनी सोलापूर रोडवरील मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेला ट्रक लावला व ते झोपी गेले. त्यानंतर पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास चार ते पाच चोरटे तेथे आले. त्यांनी ट्रकची एक बॅटरी काढली. दुसरी काढत असताना भोईटे यांना जाग आली. त्यांनी चोरट्यांना विरोध केला, त्यात त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी एकाने भोईटे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे ते त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन पळत जाऊ लागले. काही अंतर गेल्यानंतर ते रस्त्यावरच कोसळले. ही घटना घडल्यानंतर चोरटे पळून गेले.

भोईटे हे रस्त्यावर पडले असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना हा अपघाताचा प्रकार असावा, असे वाटले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले, पोलीस बीट मार्शल हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले तर भोईटे यांना अपघात झाल्यानंतर जशा अंगावर खुणा असतात तशा काहीही दिसून आल्या नाहीत. त्यांनी मृतदेह सरळ केला. तेव्हा त्यांच्या छातीत वार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बॅटरी चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय
रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांतील बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या टोळ्या पुण्यात सक्रीय असल्याच्या घटना वारंवार दिसून आल्या आहेत. आता त्यांची मजल खुन करण्यापर्यंत गेली आहे. रस्त्याच्या कडेला लावलेले ट्रक, बस तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत लावण्यात आलेल्या साईन बोर्डच्या बॅटऱ्या चोरुन नेण्याच्या घटना शहरात सर्रास घडत आहे. अनेक पीएमपी बसगाड्या रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर पार्क केल्या जातात. त्यांच्या बॅटऱ्या चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. पूर्वी एक किंवा दोन चोरटे अशा चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांना पकडले होते. पण आता हे चोरटे टोळ्यांनी गुन्हे करु लागल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे.

Web Title: Pune : truck driver brutally murdered by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.