पुणे : महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिरात साप दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 02:28 PM2018-02-15T14:28:35+5:302018-02-15T14:30:26+5:30
वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन, तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी...
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात साप दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन, तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलनचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.
करंजे (ता. बारामती) येथील प्रसिद्ध सोमेश्वर देवस्थान मंदिरात मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या भाविकांकडून पैसे घेऊन सर्परुपी सोमेश्वराचे दर्शन दिले जात असल्याचा व्हिडीओ एका जागृक भाविकाने व्हायरल केला. त्यानंतर सोमेश्वरनगर परिसरात बुधवारी (दि. १४) एकच खळबळ उडाली.
महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. येथे सर्परुपी सोमेश्वराने दर्शन दिल्यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. परंतु, देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब आत्माराम भांडवलकर हे भाविकांकडून पैसे घेऊन सोमेश्वराचे दर्शन देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाने बुधवारी सकाळी तातडीने बैठक घेऊन बाळासाहेब भांडवलकर यांच्याकडून याबाबतचा खुलासा मागितला. या खुलाशानंतर तो खुलासा धर्मादाय आयुक्तांकडे पाठवून देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित विश्वस्तावर कारवाई करण्यात येईल, असे देवस्थान कडून सांगण्यात आले.
या अगोदरही याठिकाणी असे प्रकार घडले असल्याचे अनेकांनी खासगीत सांगितले. या देवस्थान ट्रस्टला राज्य शासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
...नक्की कारवाई केली जाईल-
अॅड. गणेश आळंदीकर : सोमेश्वर देवस्थान मंदिराचा मी विश्वस्त झाल्यानंतरची विश्वस्तपदातील पहिलीच महाशिवरात्र काल होती. काही चुकीची कामे होत असतील, तर त्यावर नक्की उपाययोजना करू. चुकीची कामे करणाºयांना सर्व विश्वस्त मंडळाच्या निदर्शनास त्या बाबी आणून नक्की कारवाई केली जाईल.
...घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय
विनोद भांडवलकर (अध्यक्ष, सोमेश्वर देवस्थान) : घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या बाबत विश्वस्त मंडळाची तातडीची मिटिंग घेऊन यामध्ये संबंधित पुजाºयाला खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा न दिल्यास धर्मदाय आयुक्तांकडे हे प्रकरण दिले जाईल.