SPPU| पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉगच्या परीक्षा १५ फेब्रुवारीनंतर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:34 AM2022-01-27T11:34:57+5:302022-01-27T11:35:45+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीनंतर सुरू होण्याची शक्यता असून प्रथमत: ‘बॅकलॉग’च्या ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीनंतर सुरू होण्याची शक्यता असून प्रथमत: ‘बॅकलॉग’च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र, परीक्षा विभागाच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यासाठी येत्या २९ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे जाहीर करण्यात आले; परंतु अद्याप परीक्षा मंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच व्यवस्थापन परिषदेकडून एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या खर्चास मान्यताही घेण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा विभागाच्या कामकाजावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नाराज आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबतची निविदा प्रक्रिया राबविली न गेल्याने मागील वर्षी सुमारे एक महिना परीक्षा उशिरा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी परीक्षा विभाग व विद्यापीठ प्रशासन यांच्या समन्वय नसल्याचे दिसून आले होते. या वर्षीसुद्धा ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीबरोबर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा विभागाच्या एकूण कामकाजावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्या तरी अद्याप परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, सुरुवातीला पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू केली जाणार असून त्यानंतर अंतिम वर्षाच्या, द्वितीय वर्षाच्या व नंतर प्रथम वर्षाच्या परीक्षा टप्प्या-टप्पाने घेतल्या जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.