पुणे विद्यापीठ निवडणूक : अधिकार मंडळांवर दोन्ही पॅनलला संमिश्र यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:25 AM2018-01-24T06:25:47+5:302018-01-24T06:25:57+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवरील प्राचार्य गटामध्ये ६ पैकी ५ जागांवर प्राचार्य महासंघाचे उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर विद्यापीठ अध्यापक, विद्या परिषदेवर सावित्रीबाई फुले शिक्षक संघाने, तर अध्यापक गटामध्ये स्पुक्टो-पुटा गटाने बाजी मारली.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवरील प्राचार्य गटामध्ये ६ पैकी ५ जागांवर प्राचार्य महासंघाचे उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर विद्यापीठ अध्यापक, विद्या परिषदेवर सावित्रीबाई फुले शिक्षक संघाने, तर अध्यापक गटामध्ये स्पुक्टो-पुटा गटाने बाजी मारली.
अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद व अभ्यास मंडळांच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सर्वांत पहिल्यांदा विद्यापीठ अध्यापक संघाची मतमोजणी पार पाडली. त्यामध्ये खुल्या गटातून संजय ढोले, राखीव प्रवर्गातून मनोहर जाधव व महिलांमधून ज्योती भाकरे निवडून आले.
प्राचार्य गटातून ६ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये प्राचार्य महासंघाचे व्ही. बी. गायकवाड, शशिकांत लोखंडे,
दिनेश नाईक, प्रकाश पाटील व संजय खरात विजयी झाले. त्याचबरोबर मनोहर चासकर यांनी चांगली लढत देऊन
विजय खेचून आणला. प्राचार्य महासंघाचे उमेदवार संभाजी पठारे यांचा पराभव झाला.
अध्यापक गटातून स्पुक्टो-पुटा पॅनलच्या कल्पना अहिरे, बाळासाहेब सागडे, विलास उगले विजयी झाले. त्याचबरोबर खुल्या गटातही त्यांचे उमेदवार आघाडीवर होते.
विद्या परिषद गटातून सावित्रीबाई फुले शिक्षक महासंघाचे डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. प्रसन्न देशमुख, डॉ. विलास खरात, डॉ. सुनीता आढाव विजयी झाले.
अभ्यास मंडळांवरील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (मराठी- शिरीष लांडगे-पाटील, संदीप सांगळे, दिलीप पवार), (हिंदी - जीभाऊ मोरे, राजेंद्र खैरनार, हनुमंत जगताप), (बिझनेस प्रॅक्टिसेस - नितीन घोरपडे, बाबासाहेब सांगळे, शिरीष गवळी), (बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन - अशोक कांबळे, यशवंत पवार, राजेंद्र कमलाकर), (बँकिंग फायनान्स - तानाजी साळवे, केवल खैरनार, भास्कर जंगले).
(राज्यशास्त्र - विलास अवारे, दत्तात्रय वाबळे, विठ्ठलराव कापडिया), (मानसशास्त्र -मृणाल भारद्वाज, दिगंबर दरेकर, अभय शाळिग्राम), (कॉम्प्युटर सायन्स - शुभांगी भांतब्रेकर, विलास वाणी, साहेबराव शिंदे), (वनस्पतिशास्त्र - अशोक तुुवार, बाजीराव शिंदे, कृष्णा गायकवाड), (इतिहास - राजेंद्र रासकर,
किसन अंबाडे, राजेंद्र भामरे), (अर्थशास्त्र- आशा पाटील, वैशाली पाटील, संभाजी काळे) विद्या परिषद - अशोक भोसले.
मतमोजणींच्या ठिकाणी पत्रकारांना मज्जाव
मतमोजणीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना निवडणूक अधिकारी व प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी मज्जाव केला. त्यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पत्रकारांना प्रवेश देण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी त्यांना थांबू देण्यात आले नाही. अधिसभेची एकंदर निवडणूक प्रक्रियाच अपारदर्शक पद्धतीने राबविण्यात आलेली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून त्याची माहिती देण्यासाठी एकही पत्रकार परिषद घेण्यात आली नाही अथवा प्रेस नोट काढली गेली नाही. वस्तुत: निवडणुकीची माहिती प्रत्येक टप्प्यावर जाहीर करणे बंधनकारक असताना त्याचे पालन करण्यात आलेले नाही. याविरुद्ध कुलगुरूंकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे.