SPPU | 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग'मध्ये पुणे विद्यापीठाची 50 अंकांनी सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:06 PM2022-06-09T12:06:58+5:302022-06-09T12:10:57+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँकींग सुधारली...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023' मध्ये 591-600 गटातून 541-550 रँक गटात पोहोचले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पुणे विद्यापीठाची रँक तब्बल 50 ने सुधारली आहे. विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांचे मानांकन आहे.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग ही जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रातील एक अतिशय प्रतिष्ठित रँकिंग प्रणाली आहे. गेल्या काही वर्षांत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या क्रमवारीत अग्रगण्य भारतीय विद्यापीठांच्या यादीत गणली जात आहे.
या वर्षीची क्रमवारी बुधवारी (8 जून) जाहीर करण्यात आली. क्रमवारीत जगभरातील 1422 संस्था आणि विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये भारतातील 41 आयआयटी (Indian Institutes of Technology) आणि आयआयएस (Indian Institute of Science) सारख्या संस्थांचा समावेश आहे.
'दी टाइम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग 2022' ने यावर्षी 'दी डेटापॉईंट' संशोधन श्रेणीमध्ये विशेष पुरस्कार जाहीर केला. यामध्ये 500 पेक्षा जास्त आशियाई शैक्षणिक संस्थांमधून निवडलेल्या 8 अंतिम स्पर्धकांमध्ये पुणे विद्यापीठाने अव्वलपदी बाजी मारली आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने सातत्याने प्रगती केली आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक म्हणून मानाचे स्थान मिळवले आहे. रँकिंगमधील या प्रगतीमुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स’साठी आमचा दावा आणखी मजबूत झाला.
प्रा. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ
या वर्षी आम्ही आमची रँक 50 ने सुधारली आहे. पुणे विद्यापीठ जगातील शैक्षणिक संस्थांच्या यादीत आणखी उच्च स्थानावर नेण्याची क्षमता आपल्याजवळ आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आम्ही अनेक संकल्पना स्वीकारत आहोत आणि त्यांची पुनर्बांधणी करत आहोत. ही रँक मिळाल्याने मला आनंद झाला आहे. पुणे विद्यापीठामधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन!
-कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ