पुणे विद्यापीठातील कार्यक्रम, आंदोलने 'बंद'; कायदेशीर कारवाई हाेणार, सुरक्षा यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:12 AM2023-11-06T10:12:33+5:302023-11-06T10:13:17+5:30
अन्यथा कायदेशीर कारवाई हाेणार, सुरक्षा यंत्रणा सतर्क...
पुणे : विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमधील वाद आदी अशैक्षणिक घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल राजकीय आखाडा झाल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी विद्यापीठाने सभासद नाेंदणी, विविध अभियान, आंदाेलन, कार्यक्रम, उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. याबाबतचे परिपत्रक कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.
पोलिस प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रमांचे आयोजन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली आहे. विद्यापीठामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आणि नोंदणी करूनच, प्रवेश दिला जात आहे. तसेच वसतिगृहात केवळ रहिवासी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचेही डाॅ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.
...तर विद्यापीठ चालू देणार नाही : आ. राेहित पवार
आमदार राेहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पवार म्हणाले, पंतप्रधान यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिले असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. विद्यापीठात बाहेरून येऊन मुले विद्यार्थ्यांना मारहाण करीत असतील तर त्याचा मी निषेध करताे. छत्रपती शिवाजी महाराज हाॅल ज्यांनी फोडला, त्यांच्यावर विद्यापीठाने कारवाई केली नाही आणि त्यांनीच विद्यार्थ्यांना मारहाण केली. सुरक्षारक्षकांनी चित्रफित काढण्याऐवजी विद्यार्थिनींची मदत करायला पाहिजे हाेती. विद्यापीठ प्रशासन आणि पाेलिसांनी तीन दिवसांत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास आम्ही विद्यापीठ चालू देणार नाही, असेही ते म्हणाले.