‘फुकटचंबू’ सहसंचालकांना पुणे विद्यापीठाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 06:00 AM2019-04-26T06:00:00+5:302019-04-26T06:00:09+5:30
सहसंचालकांनी अतिथी गृहातली खोली १५ महिने ताब्यात ठेवल्याने अनेकदा अभ्यागतांची गैरसोय झाली.
दीपक जाधव
पुणे : उच्च शिक्षण संचलनालयात सहसंचालकपदी कार्यरत असताना डॉ. मोहन खताळ यांनी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या अतिथी गृहात १५ महिने चक्क फुकट मुक्काम ठोकला. खताळ यांनी याच काळात राज्य शासनाकडूनही ‘एचआर’चा लाखो रूपयांचा भत्ता उकळला. एकीकडे विद्यापीठाला लुबाडणाऱ्या खताळ यांनी शासनालाही फसवले. विद्यापीठ प्रशासनाने निवास शुल्क भरण्याची विनंती करूनही खताळींनी ती न भरल्याने अखेर त्यांच्याकडून ३ लाख ९ हजार ७५० रूपयांच्या वसुलीचे आदेश व्यवस्थापन परिषदेने दिले आहेत.
विद्यापीठाच्या अतिथी गृहात विभागातील विविध परिषदा, परिसंवाद यासाठी येणाºया तज्ज्ञ मार्गदर्शक, प्राध्यापक व इतरांसाठी राहण्याची सुविधा नाममात्र दरामध्ये (प्रति दिवस २०० रूपये) उपलब्ध करून दिली जाते. डॉ. मोहन खताळ यांची पुण्याच्या सहसंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर ते २५ ऑक्टोबर २०१७ रोजी अतिथी गृहात मुक्कामासाठी आले. अतिथी गृहातल्या खोल्या या तात्पुरत्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र डॉ. खताळ २५ ऑक्टोबर २०१७ पासून त्यांची बदली होईपर्यंत म्हणजे २९ जानेवारी २०१९ पर्यंत विद्यापीठाच्या अतिथी गृहातच तंबूू ठोकून राहिले. हा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या ते देगलूरच्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रूजू झाले आहेत. देगलुरला रुजू झाल्यावरच त्यांनी अतिथी गृहातली खोली सोडली. खताळ यांनी अतिथी गृहातली खोली १५ महिने ताब्यात ठेवल्याने अनेकदा अभ्यागतांची गैरसोय झाली.
पुण्यात डॉ. खताळ यांना शासकीय निवासस्थान वा इतर ठिकाणी राहण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र त्यांनी त्याऐवजी कोणतेही शुल्क न भरता आपल्या अधिकारपदाचा गैरवापर करून विद्यापीठाच्या अतिथी गृहात राहणे पसंत केले. शासनाकडून मिळणारा या काळातील लाखो रूपयांचा घरभत्ताही लाटल्याचे उजेडात आले आहे.
विद्यापीठाच्या गृहव्यवस्थापन विभागाने त्यांच्या निवासकाळातील शुल्काचे ३ लाख ९ हजार ७५० रूपये जमा करण्याचे पत्र १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाठविले होते. मात्र तरीही त्यांनी शुल्क भरलेले नाही. मोठया अधिकारपदावरील व्यक्तींच्या संदर्भातील हा विषय असल्याने व्यवस्थापन परिषदेने योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली. डॉ. मोहन खताळ यांची कृती पूर्णत: चूक असल्याने तसेच त्यांनी अधिकारी असल्याने निवास शुल्क माफ करण्याची केलेली विनंती मान्य करता येण्यासारखी नसल्याने त्यांच्याकडून संपूर्ण शुल्काची वसुली करण्याचा ठराव परिषदेकडून एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
.......
शुल्कमाफीसाठी अधिकारपदाचा रोब
‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अतिथी गृहात २५ऑक्टोबर २०१७ ते २९ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये राहत असताना उच्च शिक्षण विभागात मी सहसंचालक या अधिकारी पदावर कार्यरत होतो. त्यामुळे माझे सर्व निवास शुल्क माफ करण्यात यावे,'' अशी अजब मागणी डॉ. मोहन खताळ यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे पत्राव्दारे केली होती. मात्र व्यवस्थापन परिषदेने हा दबाव फेटाळून लावला.
.......................
कोणालाही शुल्कात सुट नाही
विद्यापीठाच्या अतिथी गृहाचे सुधारीत शुल्क ३ आॅगस्ट २०१७ रोजी निर्धारीत करण्यात आले. त्यानुसार कोणताही शासकीय अधिकारी, व्यक्ती वा पदास शुल्कात सुट नाकारण्यात आली नाही. विद्यापीठाच्या गृहव्यवस्थापन विभागाने ही बाब व्यवस्थापन परिषदेच्या निर्दशनास आणून दिली.