SPPU: पुणे विद्यापीठाची बाजी! ‘इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे तर राज्यात पहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 11:03 AM2021-12-30T11:03:06+5:302021-12-30T11:19:22+5:30
२०२१ या वर्षात देशातील एक हजार ४३८ शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत सहभाग घेतला
पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन ॲचिव्हमेंट (Atal Ranking of Institutions on Innovation Achievements, ARIIA) या नवोपक्रम राष्ट्रीय क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) देशात आठवे स्थान मिळवले आहे, तर पुणे विद्यापीठ हे राज्य पातळीवरील विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळवल्याने विद्यापीठाचे कौतुक होत आहे.
देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये ‘नवोपक्रम व उद्योजकता विकास’ होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’तर्फे शिक्षण संस्थांची नवोपक्रमातील उद्दिष्टपूर्ती याविषयी राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. २०२१ या वर्षात देशातील एक हजार ४३८ शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत सहभाग घेतला. यामध्ये देशातील अभिमत व राज्य विद्यापीठांच्या पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे.
विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, “स्टार्टअप, नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी विषयांशी संबंधित अनेक कार्यक्रम वर्षभरात विद्यापीठाने घेतले. इनोव्हेशन पार्क, आयआयटी खरगपूर, आयआयटी मुंबई, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, व्हेंचर सेंटर अशा अनेक संस्थांसोबत विद्यापीठाने एकत्रित उपक्रम राबविले. सध्या विद्यापीठात ४० स्टार्टअप सुरू आहेत, तर ३४० संलग्न महाविद्यालयांत इनोव्हेशन सेल स्थापन केले आहे.”
“विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयांत नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठीच ‘इनोव्हेशन सेल’ची स्थापना विद्यापीठात केली. शिक्षण, उद्योग आणि सामाजिक प्रश्न यांच्या एकत्रीकरणातून नवोपक्रम आणि नवसंशोधन व्हावे, यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. अटल क्रमवारीत मिळालेले स्थान ही विद्यापीठाने केलेल्या कामाची पावती आहे.”
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ