Maharashtra College Reopen: पुणे विद्यापीठाला ऑफलाईन परीक्षा घेता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 11:00 PM2022-01-25T23:00:00+5:302022-01-25T23:00:02+5:30
राज्यातील विद्यापीठांना येत्या 15 फेब्रुवारीनंतर ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे
राहुल शिंदे
पुणे : राज्यातील विद्यापीठांना येत्या 15 फेब्रुवारीनंतर ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणा-या अधिकाधिक परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्या भवितव्याचा विचार करून ऑफलाईन परीक्षांचाच पर्याय निवडावा,असे मत शिक्षणतज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयांनी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा आॅनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात. परंतु,त्यानंतरच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विद्यार्थी अथवा त्याचे कुटंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा इतर समस्यांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाली नाही तर त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने पुनर्रपरीक्षा घ्यावी. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही,याची दक्षता घ्यावी,असेही शासनाने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे केवळ शासन आदेशामुळे विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागत होत्या. मात्र, ऑनलाईन परीक्षांमध्ये अनेक तृटी असल्याचे निदर्शनास आले होते. बहुतांश विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. मात्र,त्यामुळे कंपन्यांसमोर या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. परिणामी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. एकूणच ऑनलाईन परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व करिअरच्या दृष्टीकोनातून योग्य ठरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवावा, असेही तज्ञांकडून सांगितले जात आहे.
''ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणा-या परीक्षेत अनेक तृटी आहेत.त्यातून विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यपामन करता येत नाही. शासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्यास परवानगी दिली असेल तर विद्यार्थी हिताचा विचार करून विद्यापीठाने कोरोना परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक विषयांच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात असे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण अडसूळ यांनी सांगितले.''
''विद्यापीठांनी आता ऑफ लाईन व ऑनलाईन हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध करून द्यावेत.विद्यार्थी सुजान असून कोणत्या पध्दतीने परीक्षा देण्यात आपले हित आहे, हे विद्यार्थी जाणतात.आॅफलाईन पध्दतीने परीक्षा सुरू केल्यानंतरच शिक्षण व्यवस्थेची घसरलेली गाडी रुळावर येईल असे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा.नंदकुमार निकम यांनी सांगितले.''