SPPU: पीएचडी प्रवेशाचा सावळागोंधळ; विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 08:31 PM2021-10-31T20:31:11+5:302021-10-31T20:34:41+5:30
विद्यापीठावर पीएचडी (PHD) प्रवेश प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (SPPU) पीएच.डी.प्रवेश (PHD) प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे (गाईड) कोणत्या संवर्गातील किती जागा द्याव्यात याबाबतचा निर्णय न झाल्यामुळे विद्यापीठावर पीएच.डी. प्रवेश प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण प्रवेशासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुणे विद्यापीठातील विविध विभाग व पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.तसेच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, मार्गदर्शकांना संवर्ग निहाय जागांचे वितरण करण्याबाबतची माहिती अद्ययावत नसल्याचे समोर आले.
तसेच यापूर्वी एका गाईडकडे खुल्या संवर्गातील,मागासवर्गीय व परदेशी विद्यार्थी असे वितरण केले जात होते. परंतु, आता एकूण विद्यार्थी आणि गाईडकडे उपलब्ध असणा-या जागांचे गणित मांडून नवीन नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली असून या समितीकडून घेतल्या जाणा-या निर्णयानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. विद्यापीठातर्फे याबाबत जिल्हानिहाय शिबिराचे आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे पीएच.डी.प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिध्द केले जाणार आहे,असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.