पुणे अनलॉक 4: महापालिका आयुक्तांचा पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा, ' हे ' निर्बंध राहणार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:06 AM2020-09-03T01:06:48+5:302020-09-03T01:07:09+5:30
काय सुरू आणि काय राहणार बंद? वाचा सविस्तर...
पुणे : केंद्र व राज्य शासनाने ‘अनलॉक 4’ चे आदेश निर्गमित केल्यानंतर पालिकेनेही नवे आदेश जाहीर केले आहेत. काही प्रमाणात पालिकेनेही नागरिकांना दिलासा देताना काही निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. यापूर्वीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणेच कार्यवाही सुरु राहणार आहे.
पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शिक्षण संस्था बंदच राहणार आहेत. यासोबतच जीम, सिनेमा हॉल, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क, धार्मिक स्थळे, जलतरण तलाव, सामाजिक, धार्मिक, राजकिय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलने यांनाही बंदी असणार आहे. परवानगी शिवाय आंतराष्ट्रीय विमानप्रवास करता येणार नाही. तसेच मेट्रो प्रवासासही मनाई करण्यात आली आहे.
रेस्टॉरंट व अन्य आदरातिथ्य सेवा (वैद्यकीय, पोलीस, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्टेशन, विमानतळ, विलगीकरण केंद्र) येथील उपहारगृह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारपासून पीएमपी सेवा सुरु होत आहेत. सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु ठेवता येणार आहेत. मात्र, येथील सिनेमागृह बंद राहणार आहेत. फुड कोर्ट, रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा, घरपोच सेवा सुरु राहणार आहे. हॉटेल व लॉजेस यांना 100 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यास आणि सर्व प्रकारच्या मैदानी शारीरिक खेळ व व्यायाम प्रकारांना परवानगी देण्यात आली आहे.
फिजीकल डिस्टन्सिंग आणि अन्य सुरक्षेच्या नियमांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. शासकीय आस्थापनांमधील अधिका-यांसाठी 100 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर कर्मचा-यांच्या 30 टक्के उपस्थितीत काम करावे लागणार आहे.
====
सार्वजनिक व खासगी वाहतूकीसंदर्भात नियमावली
टॅक्सी किंवा कॅबमधून एकावेळी वाहनचालक आणि तीन प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. तसेच आॅटो रिक्षामध्ये रिक्षाचालकासह अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. चारचाकी वाहनातून वाहनचालक आणि तीन प्रवासी तसेच दुचाकीवरुन केवळ चालकच हेल्मेट व मास्कसह प्रवास करु शकणार असल्याचे पालिका आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.