Pune Unlock: शहरातील हॉटेल्स सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत राहणार सुरू: 'या' नियमांचे पालन करणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 11:45 PM2020-10-04T23:45:09+5:302020-10-04T23:52:12+5:30
पुणे महापालिकेने हॉटेल्स सुरू करण्यास सोमवारपासून परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत..
पुणे : राज्य शासनाने हॉटेल रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर महापालिकेनेही ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी काढले. सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवता येणार असून सर्व ग्राहकांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच ग्राहकांची नावे, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, ग्राहकांनी भेट दिल्याचा दिनांक आणि वेळ इत्यादी माहिती नोंदवून ठेवावी लागणार आहे.
पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, कॉन्टॅक्ट ड्रेसिंग च्या अनुषंगाने ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनाला देण्यासंदर्भात ग्राहकांची नाहरकत घ्यावी लागणार आहे. हॉटेलमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणे आवश्यक असून ग्राहकांनी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. यासोबतच हॉटेल चालकांनी सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना करिता प्रतीक्षा कक्ष प्रवेशद्वार इत्यादी ठिकाणी हे सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच डिजिटल पद्धतीने बिल देण्यासंदर्भात ग्राहकांना सूचना द्याव्यात रोख स्वरूपात बिल घेताना पुरेशी काळजी घेतली जावी. ग्राहकांसाठी असलेल्या रेस्ट रूम आणि हात धुण्याच्या जागा याची वारंवार स्वच्छता करावी लागणार असून कॅश काउंटर आणि ग्राहकांमध्ये पारदर्शक प्लास्टिक काच बसविण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दारे, खिडक्या उघड्या ठेवणे आणि एसीचा वापर टाळणे अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.
हॉटेलमधील सीसीटीव्ही यंत्रणा आणि त्याचे रेकॉर्ड ठेवण्यात यावे. वॅलेट पार्किंगच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, डिस्पोजेबल मेन्यू कार्ड, क्यूआर कोड सारख्या माध्यमातून संपर्करहित मेनू कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे, त्याचे निर्जंतुकीकरण करावे, कापडाच्या नॅपकिन ऐवजी चांगल्या प्रतीच्या डिस्पोजेबल पेपर नॅपकिनचा वापर करणे, दोन टेबल मध्ये कमीत कमी एक मीटरचे अंतर राखणे, ग्राहकांच्या मागणीनुसार सीलबंद बाटलीतील पाणी अथवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करून देणे, शिजवलेल्या खाद्यपदार्थ व्यतिरिक्त सॅलड सारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बुफे सेवेला मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे.
ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी अन्नपदार्थ ग्राहकांना वाढावेत तसेच प्लेट, चमचे आणि सर्व सेवा उपकरणे गरम पाण्यात व मान्यताप्राप्त जंतुनाशकाने धुवावीत. ऑनलाइन आउटलेट असणाऱ्या आस्थापनांनी खाद्यपदार्थांचे आगाऊ बुकिंग, आगाऊ पेमेंट, डिलिव्हरी इत्यादीबाबत नियम आणि पॉलिसीची माहिती संकेतस्थळ, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी. करमणुकीचे लाईव्ह कार्यक्रम लग्न आणि इतर गेम एरिया आउटडोर कार्ड रूम यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. हॉटेल चालकांना आपल्या कर्मचाऱ्यांची नियमित कोविड चाचणी करावी लागणार आहे. त्यांचा गणवेश दररोज बदलला जाणे सुद्धा अनिवार्य आहे. दिवसातून दोन वेळा हा गणवेश निर्जंतुक करण्यात यावा. कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स, फूड कोर्ट व बार रेस्टॉरंट यांच्या क्षमतेनुसार ग्राहकांना प्रवेशद्वारा द्यावा. यासोबतच हॉटेलमध्ये जमा होणारा ओला-सुका, बायोडिग्रेडेबल कचरा योग्य पद्धतीने वर्गीकरण करून द्यावा. तसेच हॅन्ड ग्लोव्हज आणि मास्कचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.