Pune Vidhan Sabha 2024 : मतदानावेळी बंद पडले ३३ ईव्हीएम; सर्वाधिक ६ इंदापुरात

By नितीन चौधरी | Published: November 21, 2024 09:09 AM2024-11-21T09:09:42+5:302024-11-21T09:14:03+5:30

प्रत्यक्ष मतदानावेळी ३३ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र, तर २६ कंट्रोल युनिट व ५६ व्हीव्हीपॅट बंद पडले

Pune Vidhan Sabha 2024 33 EVMs stopped during polling; Maximum 6 in Indapur | Pune Vidhan Sabha 2024 : मतदानावेळी बंद पडले ३३ ईव्हीएम; सर्वाधिक ६ इंदापुरात

Pune Vidhan Sabha 2024 : मतदानावेळी बंद पडले ३३ ईव्हीएम; सर्वाधिक ६ इंदापुरात

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी झालेल्या मतदानादरम्यान वेगवेगळ्या कारणांनी ईव्हीएम बदलण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. प्रत्यक्ष मतदानावेळी ३३ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र, तर २६ कंट्रोल युनिट व ५६ व्हीव्हीपॅट बंद पडले. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले, तर मतदानापूर्वी घेण्यात आलेल्या मॉकपोल दरम्यानही ५२ मतदान यंत्र तसेच ३१ कंट्रोल युनिट व ४७ व्हीव्हीपॅट यंत्रेही बंद पडल्याचे आढळले. राखीव यंत्रांमधून ही यंत्रे तातडीने बदलण्यात आली. त्यामुळे त्याचा मतदानावर फारसा परिणाम झाला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएम, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उष्णतेला संवेदनशील असल्याने ते बंद पडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २०) प्रत्यक्ष मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वी झालेल्या मॉक पोलमध्येदेखील ही तिन्ही यंत्रे बंद पडल्याचे प्रकार समोर आले. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी पहाटे साडेपाच वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉकपाेल घेण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. या दरम्यान सर्व मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांची कार्यक्षमता पडताळणी करण्यासाठी हे मॉक पोल केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर हे मॉक पोल करण्यात आले. त्यात ५२ मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम बंद पडल्याचे दिसून आले. राखीव मतदान यंत्रांमधून हे ५२ मतदान यंत्र बदलण्यात आले, तसेच ३१ कंट्रोल युनिट व ४७ व्हीव्हीपॅट यंत्रेही बंद पडल्याचे आढळले. राखीव साठ्यातून हे यंत्र बदलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वाधिक सात मतदान यंत्र भोर मतदारसंघात, तर इंदापूर मतदारसंघात ६ मतदान यंत्रे बंद पडल्याचे सांगण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५ मतदान यंत्रे बंद पडली होती. ते तातडीने बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदान ७ वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात अर्थात साडेसात वाजेपर्यंत एकही यंत्र बंद पडले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मतदानाच्या पहिल्या चार तासांमध्ये अर्थात ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र बंद पडले होते. तसेच १६ कंट्रोल युनिट व २८ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले होते. मतदानाच्या ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २७ ईव्हीएम, २१ कंट्रोल युनिट व ४७ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले होते, तर पाचपर्यंत ३१ ईव्हीएम, २५ कंड्रोल युनिट व ५४ व्हीव्हीपॅट बंद पडले होते, तर ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३३ ईव्हीएम, २६ कंट्रोल युनिट व ५६ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले. जिल्ह्यातील एकूण ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर ११ हजार ४२१ मतदान यंत्र बसविण्यात आली असून, बंद पडलेल्या मतदान यंत्रांचे प्रमाण केवळ ०.२८ टक्के आहे. राखीव मतदान यंत्रांमधून ही यंत्रे तातडीने बदलण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले. सर्वाधिक ६ मतदान यंत्रे इंदापूर मतदारसंघात बंद पडली, तर ४ मतदान यंत्रे वडगाव शेरी मतदारसंघात बंद पडली होती. तर जुन्नर व भोर मतदारसंघात प्रत्येकी ३ मतदान यंत्रे बंद पडली. दौंड, मावळ, चिंचवड, भोसरी व हडपसर या मतदारसंघात प्रत्येकी २ मतदान यंत्र बंद पडली होती. आंबेगाव, खेड आळंदी, पिंपरी, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती व कसबा पेठ मतदारसंघात प्रत्येकी एक मतदान यंत्र बंद पडले, तर शिरूर, बारामती, पुरंदर, कोथरूड व पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात एकही यंत्र बंद पडले नसल्याचे ईव्हीएम नोडल अधिकारी नामदेव ठिळेकर यांनी सांगितले.

Web Title: Pune Vidhan Sabha 2024 33 EVMs stopped during polling; Maximum 6 in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.