Pune Vidhan Sabha 2024 : शहरात वाढलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला ?
By राजू हिंगे | Published: November 21, 2024 09:34 AM2024-11-21T09:34:47+5:302024-11-21T09:37:25+5:30
जिल्ह्यात चांगले मतदान; शहरात वाढला मतदानाचा टक्का
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा असे एकूण २१ मतदारसंघात बुधवारी उत्साहात मतदान झाले. त्यामध्ये सांयकाळी पाचपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान इंदापूर मतदारसंघात (६४. ५० टक्के), तर सर्वात कमी पिंपरी (४२.७२ टक्के) मतदारसंघात झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा चांगले मतदान झाले. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला असून, याचा फटका कोणाला बसतो आणि फायदा काेणाला हाेताे, याची उत्सुकता लागली आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांची महायुती यांच्यामध्ये झाली. लोकसभा निवडणुकीला पुणे शहरात मतदानाचा टक्का कमी होता. याउलट ग्रामीण भागात मतदान चांगले झाले होते. या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारसंघात चांगले मतदान होऊन काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली आहे. काका आणि पुतण्यामधील या हायहोल्टेज लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामती मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का आहे तेवढाच राहिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. पिंपरीमध्ये मात्र मतदानाचा टक्का कमीच आहे.
पुणे शहरातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, कॅन्टोन्मेंट, कसबा या आठ मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पथ्थावर पडणार यावर बरेच काही अवलंबून आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला बसतो, याचीही उत्सुकता लागली आहे.
मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ - २०१९ - २०२४ (मतदानाची आकडेवारी सायंकाळ ५ पर्यंतची)
जुन्नर - ६३ - ६२.१२
आंबेगाव - ६८ - ६३.८७
खेड - ६७ - ६१.५७
शिरूर - ६७ - ५८.९०
दौंड - ६८ - ६१.९२
इंदापूर - ७५- ६४.५०
बारामती - ६८ - ६२.३१
पुरंदर - ६४ - ५२.०५
भोर - ६२ - ५८.१७
मावळ - ७२ - ६४.४४
चिंचवड - ५३ - ५०.०१
पिंपरी - ५१ - ४२.७२
भोसरी - ५९ - ५५.०८
वडगाव शेरी - ४७ - ५०.४६
शिवाजीनगर - ४४ - ४४.९५
कोथरूड - ४८ - ४७.४२
खडकवासला - ५१ - ५१.५६
पर्वती - ५० - ४८.६५
हडपसर - ४८ - ४५.०२
कॅन्टोन्मेंट - ४३ - ४७. ८३
कसबा - ५१ - ५४.९१