Pune Vidhan Sabha 2024 : पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये वाढला मताचा टक्का; धक्का कुणाला?
By राजू हिंगे | Published: November 22, 2024 08:56 AM2024-11-22T08:56:20+5:302024-11-22T08:56:20+5:30
पुणे : विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५२.९३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदान ९ टक्क्यांनी ...
पुणे : विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५२.९३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदान ९ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार यावर बरेच काही अवलंबून आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा धक्का कोणाला बसतो, याचीही उत्सुकता लागली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सुनील कांबळे आणि महाविकास आघाडीचे रमेश बागवे यांच्यात थेट लढत झाली आहे.शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये कसबा पेठनंतर पुणे कॅन्टोन्मेंट हा कमी मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. अनुसूचित जाती- जमातीसाठी राखीव मतदारसंघांपैकी एक असलेला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये कायमच चुरस पाहायला मिळाली आहे. या मतदारसंघात २०१९ साली ४३.४३ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र शहरातील आठ मतदारसंघात सर्वांत कमी मतदान होणारा पुणे कॅन्टोन्मेंटचा शिक्का मतदारांनी पुसला आहे. या निवडणुकीत १ लाख ५६ हजार ३५९ जणांनी मतदान केले आहे. त्यात पुरुष ८० हजार ३३५, तर महिला ७६ हजार ३२५ यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. १३ तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात ताडीवाला झोपडपट्टी, कासेवाडी, पत्राची चाळ, मंगळवार पेठ, पंचशीलनगर, डायस प्लॉट हा झोपडपट्टीचा भाग येतो. वानवडी, कोरेगाव पार्क, रास्तापेठ, सोमवार आणि मंगळवारपेठचा काही भाग या मतदारसंघात येतो. ताडीवाला झोपडपट्टीत ६७ हजार मतदार आहेत. संमिश्र भाग असलेल्या या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यात लाडक्या बहिणींचाही वाटा आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार यावर विजयांची गणिते ठरणार आहेत.
पंरपरा राखणार की इतिहास घडणार?
कॉंग्रेसचे रमेश बागवे यांनी २००९ मध्ये कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. दुसऱ्यांदा आमदार झालेल्या बागवे यांच्या गळ्यात गृहराज्यमंत्रिपदाची माळ पडली. परंतु २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपच्या दिलीप कांबळे यांच्याकडून बागवे यांना पराभव पत्करावा लागला. दिलीप कांबळे यांना राज्यमंत्री मंडळामध्ये समाज कल्याण विभागाचे राज्यमंत्रिपदही मिळाले होते. २०१९च्या निवडणुकीत सुनील कांबळे विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीला वेगळा चेहरा निवडून आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा मतदारसंघ निवडणुकीची परंपरा राखणार की इतिहास घडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.